उद्या सकाळी अंडरवर्ल्डचा हायड्रोजन बाँम्ब फोडणार, देवेंद्र फडणवीसांचे अंडरवर्ल्डशी संबंध उघड करणार, नवाब मलिकांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 02:32 PM2021-11-09T14:32:04+5:302021-11-09T14:37:27+5:30
Devendra Fadnavis Vs Nawab malik : मी उद्या सकाळी Underworldशी असलेल्या संबंधांबाबतचा हायड्रोजन बॉम्ब फोडणार असून, त्यावेळी Devendra Fadnavis यांचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध उघड करणार, असा इशारा Nawab Malik यांनी दिला आहे.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, असा गंभीर आरोप करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज खळबळ उडवून दिली. मात्र आता नवाब मलिक यांनी फडणवीस यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस यांनी बॉम्ब फोडण्याचा दावा केला होता. मात्र त्यांचा फटाका भिजलेला निघाला होता. मात्र मी उद्या सकाळी अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांबाबतचा हायड्रोजन बॉम्ब फोडणार असून, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध उघड करणार, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर नवाब मलिक म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना आरोप करून राईचा पर्वत केला. देवेंद्र फडणवीस हे कागदपत्रे तपास संस्थांकडे देण्याचा इशारा देत आहेत. मात्र त्यांनी कुठे जायचे असेल, तिथे जावे आम्ही तयार आहोत. फडणवीस यांनी खोट्याचं अवडंबर माजवण्याचे काम केले आहे. आज फडणवीस यांनी बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यांचा फटाका भिजलेला निघाला. आता उद्या सकाळी मी अंडरवर्ल्डशी संबंधांचा हाड्रोजन बॉम्ब फोडणार आहे. अंडरवर्ल्डच्या माध्यमातून शहराला कुणी ओलीस धरले होते. कुठला आंतरराष्ट्रीय डॉन भारतात आला होता. तो कोणासाठी काम करत होता, हे उद्या उघड करणार आहे, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते ना. नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण https://t.co/4fHBSM4Lln
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 9, 2021
दरम्यान, आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमधून देवेंद्र फडवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईतील १९९३ बॉम्बस्फोटातील आरोपींकडून मंत्री नवाब मलिकांनी कुर्ला येथे जमीन खरेदीचा व्यवहार केला होता. बॉम्बस्फोटातील आरोपींविरोधात टाडा लागला होता. टाडा लागलेल्या आरोपीची संपत्ती जप्त केली जाते. त्यामुळे ही मालमत्ता जप्त होऊ नये म्हणून मलिकांनी कमी किंमतीत ही जागा खरेदी केली का? २००३ मध्ये नवाब मलिक मंत्री होते. मलिकांचा थेट अंडरवर्ल्डशी संबंध होते. १९९३ च्या बॉम्बस्फोटात अनेक निष्पापांचे बळी गेले. ज्या लोकांनी स्फोट घडवले. रेकी केली या लोकांसोबत जमीन व्यवहार करण्यामागे काय हेतू होता? असा सवाल त्यांनी केला.