अंडरवर्ल्डचा शार्प शूटर सावंतचा मृत्यू हृदयविकारामुळे
By admin | Published: July 3, 2016 09:45 PM2016-07-03T21:45:52+5:302016-07-03T21:45:52+5:30
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याच्या टोळीतील शार्प शूटर रवींद्र शांताराम सावंत (वय ४४) याचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्कयानेच झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ३ : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याच्या टोळीतील शार्प शूटर रवींद्र शांताराम सावंत (वय ४४) याचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्कयानेच झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान, सावंतचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह त्याच्या नातेवाईकांना सोपविण्यात आला. तो घेऊन सावंत कुटुंबीय मुंबईला रविवारी दुपारी रवाना झाले.
अंडरवर्ल्ड डॉन अश्विन नाईक याच्यावर भर कोर्टात गोळी झाडून त्याच्या हत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी टाडा कायद्यानुसार रवींद्र सावंतला ७ सप्टेंबर १९९६ ला कोर्टाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.
सुरक्षेच्या कारणावरून सावंतला १९ सप्टेंबर १९९६ ला नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले. तेव्हापासून अर्थात गेल्या २० वर्षांपासून सावंत मध्यवर्ती कारागृहात आजन्म कारावासाची शिक्षा भोगत होता. शुक्रवारी रात्री ७ च्या सुमारास सावंतची प्रकृती ढासळल्याने त्याला मेडिकलमध्ये नेण्यात आले. तेथे काही वेळातच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर उलटसुलट चर्चेला उधान आले. त्याची माहिती धंतोली पोलीस आणि कारागृह प्रशासनाने सावंतच्या नातेवाईकांना कळविली. त्याचे नातेवाईक मुंबईला जोगेश्वरी (पूर्व) तील एमएचबी कॉलनी, मेघवाडीत राहतात.
ते येथे पोहचले नसल्याने शनिवारी पोलीस आणि डॉक्टरांनी सावंतचे शवविच्छेदन करण्याचे टाळले. रविवारी मनोहर आणि राकेश हे रवींद्रचे दोन मोठे भाऊ काही नातेवाईकांसह नागपुरात पोहचले. त्यानंतर मेडिकलच्या डॉक्टरांनी सावंतचे शवविच्छेदन करून मृतदेह सावंत कुटुंबीयांच्या हवाली केला. यावेळी काही पत्रकारांनी सावंत कुटुंबीयांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला. दुपारी एका अॅम्बुलन्समधून रवींद्रचा मृतदेह घेऊन सावंत कुटुंबीय मुंबईकडे रवाना झाले. सावंतच्या मृत्यूचे कारण स्पष्ट करताना धंतोली पोलिसांनी त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानेच झाल्याचे सांगितले.