मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांना गंडा

By admin | Published: May 20, 2016 01:41 PM2016-05-20T13:41:49+5:302016-05-20T13:41:49+5:30

मर्चंट नेव्ही मध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून शेकडो विद्यार्थ्यांना गंडा घातल्यानंतर आरोपींनी पलायन केले

Unemployed for the job in Merchant Navy | मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांना गंडा

मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांना गंडा

Next
>नागपूर : मर्चंट नेव्ही मध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून शेकडो विद्यार्थ्यांना गंडा घातल्यानंतर आरोपींनी पलायन केले.  तक्रार करूनही फरार आरोपींवर  कारवाई करण्याची पोलीस तत्परता दाखवत नसल्याने पीडित बेरोजगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे संतप्त बेरोजगारांनी शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास छत्रपती चौकात घोषणाबाजी करून न्यायाची मागणी केली.
 
सुमीत सिंग, विवेक संकलन आणि भूपेंद्र चौधरी अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी गेल्या वर्षी प्रतापनगरात नेक्स्ट स्केप मरिन अकादमी नावाची संस्था सुरू केली. संस्थेत ३ महिने प्रशिक्षण घेणा-याला मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी लावून देण्याची बतावणी आरोपी करीत होते. १ लाख, ४० हजार रुपये प्रशिक्षण शुल्क ठेवण्यात आले होते. शंभर टक्के नोकरीची हमी मिळत असल्यामुळे अनेक बेरोजगारांनी कर्ज घेऊन, ईकडून तिकडून उधार घेऊन संस्थेत रक्कम जमा केली. एका बॅचमध्ये ३० ते ४० मुले अशा प्रकारे आरोपींनी ८ ते १० बॅच सुरू केल्या. प्रशिक्षणाचा कालावधी संपल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांपैकी कुणाला चेन्नईत तर कुणाला हैदराबाद येथे कंपनीत पाठवू लागले. तेथे अनेक दिवस प्रयत्न करूनही नोकरी मिळत नसल्याने प्रशिक्षणार्थी परत येऊ लागले. पीडित बेरोजगार एक एकटे परत येत असल्याने संस्थेचे आरोपी त्याची पद्धतशिर समजूत काढून त्याला परत पाठवित होते. काही दिवसांपूर्वी एकाच दिवशी अनेक बेरोजगार संस्थेच्या कार्यालयात आल्याने आरोपींची बनवाबनवी उघड झाली. त्यावेळी त्यांनी असंबंध उत्तरे देऊन वेळ मारून नेली आणि नागपुरातून पलायन केले. 
 
पोलिसांकडे तक्रार 
 
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने पीडित बेरोजगारांनी प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. मात्र, अनेक दिवस होऊनही आरोपींना अटक करण्यात आली नाही. त्यामुळे पोलीसही टाळाटाळ करीत असल्याचे पीडितांना वाटत आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारी १२ वाजता पीडित बेरोजगारांनी छत्रपती चौकात गोळा होऊन आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. जोरदार नारेबाजीही केली.
 
अनेक ठिकाणी गंडा 
 
आरोपींनी प्रशिक्षणार्थ्यांकडून ३ ते ४ कोटी रुपये गोळा करून पलायन केल्याचा आरोप आहे. नागपूर प्रमाणेच आरोपींनी मुंबईसह अन्य ठिकाणीही बेरोजगारांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचा आरोप आहे. पोलीस या आरोपींवर काय कारवाई करते, त्याकडे सा-यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Unemployed for the job in Merchant Navy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.