राज्याच्या पाणी व स्वच्छता विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 10:17 PM2020-07-29T22:17:40+5:302020-07-29T22:17:52+5:30

ऐन कोरोना काळात काढले सेवा समाप्तीचे आदेश

Unemployment ax on hundreds of employees of state water and sanitation department! | राज्याच्या पाणी व स्वच्छता विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड!

राज्याच्या पाणी व स्वच्छता विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड!

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यातील 1300 तर पुणे जिल्ह्यातील 30 कर्मचारी होणार कमी

पुणे: पंधरा ते वीस वर्षांपासून उत्कृष्ट सेवा देत पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचारी राज्य हागणदारीमुक्त करण्यासाठी झटले. असे असतानाही स्वच्छतेसंदर्भात आपले मोलाचे योगदान देणाऱ्या राज्यातील सुमारे १३०० कर्मचाऱ्यांवर शासनाने बेरोजगारीची कुऱ्हाड चालविली आहे. ३१ जुलैपासून सेवा समाप्त करत असल्याचे पत्र सरकारने काढल्याने या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर ऐन कोरोना संकटात बेकरीचे आणखी एक संकट कोसळले आहे.

पाणी व स्वच्छता विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम व जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक जिल्हा परिषद व तालुक्याच्या पंचायत समितीच्या ठिकाणी कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. याच शिलेदारांनी आयुष्याची उमेदीची वये घालवली, जीवाचे रान केले व गावापासून ते राज्य हागणदारीमुक्त करण्यासाठी अहोरात्र सेवा दिली. आताही कोरोना काळात स्वच्छतेबाबत गावस्तरावर अनेक स्वच्छताविषयक जनजागृतीचे काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. जे कर्मचारी १५ ते १७ वर्षांपासून आपली सेवा देत आहेत, त्यांना सुविधा देणे तर सोडाच त्यांच्या मानधनात वाढ न करता उलट त्यांना घरचा रस्ता दाखवून त्यांच्यावर उपासमारीची वेळ सरकारने आणली आहे. यामुळे शेकडो संसार उघड्यावर येणार आहेत.
 ..........
न्यायालयात दाद मागणार
 अचानक काढण्यात आलेल्या समाप्तीच्या आदेशामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. आता आपल्या रोजीरोटीचे काय, चिल्ल्यापाल्यांचे काय होणार? असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर उभे राहिले आहेत. या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसेच राज्यभरात धरणे आंदोलनांच्या माध्यमातून आपल्या न्याय्य हक्कासाठी लढा उभारला जाणार असल्याचे कर्मचारी म्हणाले.

.....
 राज्यातील कंत्राटी कर्मचारी वर्गाला कोणतीही पूर्व कल्पना न देता अचानक कामावरुन कमी करणेचे आदेश देत आहेत. या अचानक आलेल्या सेवा समाप्तीच्या आदेशामुळे पाणी व स्वच्छता विभागाचे पुणे जिल्यातील 30 व राज्यातील अंदाजे 1500 कर्मचा-यांना कामावरुन कमी करण्यात येणार आहे. 
सध्या जगभरात कोरोना महामारी असून पाणी व स्वच्छता विभागातील जिल्हा व तालुका स्तरावरील कंत्राटी कर्मचा-यांनी अशा महामारीच्या काळात त्यांचे कुटुबांचा उदर्निवाह कसा करावा असा प्रश्न त्यांचे समोर पडलेला आहे. 
-विकास कुडवे, स्वछता आणि पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी, जिल्हा परिषद

Web Title: Unemployment ax on hundreds of employees of state water and sanitation department!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.