माझ्याविरोधात नाहक षड्यंत्र
By admin | Published: May 21, 2017 01:43 AM2017-05-21T01:43:51+5:302017-05-21T01:43:51+5:30
जुहू येथील एस्टेला रेस्टॉरंटच्या संबंधित व्यक्तींनी माझ्याविरोधात खोटेनाटे आरोप करून माझी बदनामी केली आहे. या रेस्टॉरंटमध्ये गेलेल्या व्यक्तींशी माझा
- लोकमत न्यूज नेटवर्क
कणकवली (जि.सिंधुदुर्ग) : जुहू येथील एस्टेला रेस्टॉरंटच्या संबंधित व्यक्तींनी माझ्याविरोधात खोटेनाटे आरोप करून माझी बदनामी केली आहे. या रेस्टॉरंटमध्ये गेलेल्या व्यक्तींशी माझा कोणताही संबंध नाही. त्याचप्रमाणे तेथे कोणत्याही प्रकारची तोडफोड झालेली नाही. पोलीस तपासात सर्वप्रकारचे सहकार्य मी देणार आहे, असे आमदार नीतेश राणे यांनी म्हटले आहे.
मुंबई येथील सांताक्रुझ पोलिसांनी नीतेश राणेंसह तिघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाबाबत नीतेश राणे यांनी शनिवारी प्रसिद्धिपत्रकातून माहिती दिली. हे प्रकरण म्हणजे एका षड्यंत्राचा भाग आहे. या रेस्टॉरंटमध्ये जोरजोरात गाण्यांचा आवाज केला जातो. रात्री उशिरापर्यंत ही गाणी सुरू असतात. पहाटे चार-पाच वाजेपर्यंत या रेस्टॉरंटमध्ये असा धुमाकूळ आणि जोरजोराने गाण्यांचे आवाज सुरू असतात. याबद्दल नारायण राणे यांनी स्थानिकांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई महानगरपालिका आयुक्त या दोन्ही अधिकाऱ्यांना पत्र लिहून जनतेला होणाऱ्या त्रासाची जाणीव करून दिली होती. रेस्टॉरंटमधील घटनांबाबत कार्यवाही करण्याचेही सांगितले होते, असेही या पत्रकात म्हटले आहे.
कॉल रेकॉर्ड तपासणार
जुहू रोड परिसरात आॅक्टोबर २०१६ पासून निखिल मिराणी आणि हितेश केसवानी (३१) यांचे एस्टेला हॉटेल सुरू आहे. नीतेश राणे यांनी या हॉटेलमध्ये भागिदारीसह दर महिन्याला १० लाख रुपये देण्याची मागणी केल्याचा आरोप केसवानी यांनी केला आहे. त्यातूनच गुरुवारी रात्री हॉटेलमध्ये घुसखोरी करत तोडफोड केल्याची तक्रार त्यांनी केली आहे. त्यानुसार सांताक्रु झ पोलिसांनी नीतेश राणेंसह त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध खंडणी, घुसखोरी करुन मारहाण, शिविगाळप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे.
केसवानी यांच्या कॉलवर राणेंनी केलेला कॉल रेकॉर्डही मागविण्यात आला आहे. हे कॉल रेकॉर्ड तपासणार असून मोबाईल सीडीआरच्या आधारे याप्रकरणाची अधिक चौकशी हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच राणे यांची चौकशी करत पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सांताक्रुझ पोलिसांनी दिली.