शिवभूमीत संघाचे अपूर्व शक्तिप्रदर्शन
By admin | Published: January 4, 2016 01:01 AM2016-01-04T01:01:02+5:302016-01-04T01:01:02+5:30
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, नगर, कोल्हापूर, सांगली, सातारा व नाशिक जिल्हयातून आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एक लाख स्वयंसेवकांनी
पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, नगर, कोल्हापूर, सांगली, सातारा व नाशिक जिल्हयातून आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एक लाख स्वयंसेवकांनी वाद्यांच्या घोषावर शिस्तबध्द संचलन करीत विराट शक्तीप्रदर्शन केले. तब्बल २०० फुट लांब, १०० फुट रूंद व ८० फुट उंच अशा रायगड, राजगड व तोरणा किल्ल्यांचा संगम घडविणाऱ्या व्यासपीठामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली होती.
मारूंजी, नेरे व जांभे या तीन गावांच्या सीमेवरील चारशे एकर परिसरामध्ये शिवशक्तीसंगमाची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी बारा वाजल्यापासूनच स्वयंसेवक शिवशक्तीसंगमावर येऊ लागले. पश्चिम महाराष्ट्रातील ७ जिल्हयांमधील ९९७ ग्रामीण मंडले व १४४३ नागरी वस्त्यांमधून स्वयंसेवकांचा जथ्था शिवशक्तीसंगमावर एकत्र आला. पांढरा शर्ट व हाफ पँट या संघाच्या गणवेशात शिस्तबध्द रितीने नेमून दिलेल्या जागेवर बसलेल्या स्वयंसेवकांचे विहंगम दृश्य दिसून येत होते.
शिवशक्ती संगम कार्यक्रमासाठी संघाच्यावतीने खास रचना तयार करण्यात आली होती. सर्व स्वयंसेवकांनी घोष पथकाच्या तालावर या गीताचे सादरीकरण केले. प्रचंड सळसळत्या शक्तीचे प्रदर्शन यावेळी पहायला मिळाले. स्वयंसेवकांमध्ये १५ वर्षाच्या तरूणांपासून ते १०३ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकापर्यंतच्या स्वयंसेवकांचा समावेश होता. घोष पथकाने सुचनेनुसार वाद्य वाजविण्यास सुरूवात केल्यानंतर त्यांचा एकच आवाज आसमंतात दुमदुमला. शिवशक्ती संगमासाठी समाजाच्या विविध घटकातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. दुपारी तीनच्या सुमारास विशेष आतिथी कार्यक्रमस्थळी दाखल होण्यास सुरवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याच्या मंत्रीमंडळातील अनेक मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. विविध पिठांचे धर्मगुरू, कला, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर आणि उद्योजकांची मोठ्या संख्येने उपस्थिती हे कार्यक्रमाचे एक आकर्षण ठरले. विशेष अतिथींसाठी स्वतंत्र चार व धर्माचार्यासाठी स्वतंत्र प्रवेशव्दार व व्यवस्था करण्यात आली होती. या प्रवेशव्दारावर संघाच्या कामाची व सेवाकार्याची माहिती करून देणारी सीडी, तिळगुळ वडी, पाण्याची बाटली आणि सरबताचे पॅक देऊन निमंत्रितांचे स्वागत केले जात होते.
फुलांनी सजविलेल्या उघडया जीपमधून सरसंघचालक मोहन भागवत यांचे शिवशक्ती संगमावर आगमन झाले. त्यांच्यासमवेत संघाचे सहकार्यवाह भैय्याजी जोशी, प्रांतसंघचालक नानासाहेब जाधव होते. जीपमधून फिरून त्यांनी संपूर्ण संगमस्थळाचे अवलोकन केले. ध्वजारोहन झाल्यानंतर स्वयंसेकांचे गीत सादरीकरण व संचलन झाले. प्रास्ताविक झाल्यानंतर लगेच सरसंघचालकांनी त्यांचे मार्गदर्शन केले.
पश्चिम महाराष्ट्रातील मंत्री गणवेशात
शिवशक्ती संगमावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्रातील स्वयंसेवकांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून येणारे भाजपचे सर्व मंत्री, आमदार, खासदार संघाच्या गणवेशामध्ये संमेलनासाठी उपस्थित होते. केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, अन्नधान्य व पुरवठा मंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व खासदार, आमदार संघाच्या गणवेशामध्ये आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे इतर मंत्री व पदाधिकाऱ्यांनी गणवेश परिधान केला नव्हता.
रायगड, राजगड व तोरणा किल्ल्यांचा संगम
शिवशक्तीसंगमाचे सर्वाधिक आर्कषणाचे केंद्र राहिले ते रायगड, राजगड व तोरणा किल्ल्यांच्या संगमातून तयार केलेले अतिभव्य व्यासपीठ. ७ मजले उंचीचे २०० फुट लांब, १०० फुट रूंद, ८० फुट उंच असे भव्य व्यासपीठ साकारण्यात आले होते. व्यासपीठावर जाण्यासाठी लिफ्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. व्यासपीठाच्या मध्यभागी रायगडावरील मेघडंबरीची प्रतिकृती साकारून त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य प्रतिमा ठेवण्यात आली होती. उजव्या बाजूला डॉ. हेडगेवार व डाव्या बाजूला गोवळकर गुरूजी यांच्या प्रतिमा उभारण्यात आल्या होत्या. ७ मजले उंचीच्या व्यासपीठाचा सर्व दर्शनी भाग किल्ल्याच्या प्रतिकृतीने सजविण्यात आला होता.
शिवशक्ती संगमाच्या अतिभव्य अशा व्यासपीठावर केवळ ५ मान्यवरांचीच बसण्याची व्यवस्था केली होती. त्यामध्ये सरसंघचालक मोहन भागवत, सहकार्यवाह भय्याजी जोशी, पश्चिम क्षेत्र संघचालक जयंतीभाई भाडेसिया, प्रांतसंघचालक नानासाहेब जाधव,पश्चिम महाराष्ट्र प्रांतकार्यवाह विनायक थोरात व्यासपीठावर विराजमान होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह अनेक मंत्री, अनेक पीठांचे मठाधिपती व विविध क्षेत्रातील मान्यवर व्यवस्था उपस्थितांच्या पहिल्या रांगेत करण्यात आली होती.
दुष्काळग्रस्तांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मदत दिली जाणार असून त्याकरिता अर्थसहाय्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. शिवशक्ती संगमावर त्याकरिता प्रवेशव्दारामध्ये निधीकुंभ ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर दुष्काळ निवारणाच्या कार्यात प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी (०२२) ३३८१४१११ या क्रमांकावर मिस कॉल करण्याचे आवाहन करण्यात आले.