पवार पंतप्रधान झाले नाहीत हे दुर्दैव : मुख्यमंत्री
By admin | Published: December 22, 2015 02:02 AM2015-12-22T02:02:09+5:302015-12-22T02:02:09+5:30
पवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचे अभीष्टचिंतन करणारा ठराव फडणवीस यांनी विधानसभेत तर महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत मांडला
नागपूर : शरद पवार हे देशाचे नेतृत्व करण्यासाठीचे गुण असलेले नेते आहेत. ते पहिले मराठी पंतप्रधान होतील, अशी अपेक्षा होती. पण दुर्दैवाने तसे घडू शकले नाही, असे भावोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत काढले.
पवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचे अभीष्टचिंतन करणारा ठराव फडणवीस यांनी विधानसभेत तर महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत मांडला. दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी पवारांविषयीच्या भावना यावेळी व्यक्त केल्या. पवार यांना पंतप्रधान बनण्याची संधी दोनवेळा आली होती पण ती हुकली, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम म्हणाले. दोन्ही सभागृहांनी पवार यांचे अभीष्टचिंतन केले. मुख्यमंत्री म्हणाले की, आधुनिक महाराष्ट्र घडविण्यात पवार यांचे महत्त्वाचे योगदान आहे. ५५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनात त्यांनी पक्षातीत प्रतिमा निर्माण केली. आज दुर्दैवाने राजकीय अस्पृश्यता आणि संवादहीनतेकडे आपण चाललो आहोत का, असा प्रश्न मला पडतो. एकमेकांचे विरोधक असलेले पक्ष शत्रू असल्यासारखे वागतात. अशावेळी राज्याच्या वा देशाच्या व्यापक हितासाठी पक्षीय भेदांपलीकडे जाऊन विचार करणारे शरद पवार यांचे महत्त्व अधोरेखित होते.
राज्याला राजकीय शत्रूत्व विसरण्याचे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले की, विचार पटणार नाहीत तेव्हा टोकाचा विरोध करू; पण राजकीय शत्रूत्व होता कामा नये. राज्याच्या व्यापक हितासाठी प्रसंगी एकत्र येण्याची भूमिका घेतली पाहिजे. पवार यांनी हाच विचार नेहमी मांडला.
पवार यांनी आपल्या अटी-शर्र्तींवरच राजकारण केले. स्वत:ला योग्य वाटले तेच केले. काँग्रेसमधून ते बाहेर पडले तेव्हा त्यांचा राजकीय अस्त होईल असा तर्क दिला गेला; पण ते टिकून राहिले,असे मुख्यमंत्री म्हणाले.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजकीय विरोध हा मैत्रीच्या वा संबंधांच्या आड येऊ न देण्याचे शरद पवार यांचे कसब सगळ्यांनीच शिकण्याची गरज आहे, असे सांगितले. ते म्हणाले की, पवार हे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीचा चालताबोलता इतिहास आहे.
राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड म्हणाले की, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला शरद पवार यांनी दिलेल्या मोठेपणाच्या ऋणातून मी माझ्या चामड्याचे जोडे करून त्यांना घातले तरी उतराई होणार नाही. स्वत:ला कॅन्सरने ग्रासलेले असतानाही अखंड कार्यरत असलेले पवार यांच्यासाठी सामान्य माणसांची नाळ जुळून ठेवणे हेच औषध आहे. पवार यांनी सर्व पक्षांमध्ये जपलेल्या संबंधांचे अनुभव आव्हाड यांनी सांगितले.
भाजपाचे आशिष शेलार यांनी पवार हे कमिटमेंट असलेले नेते आहेत, असे सांगितले.(प्रतिनिधी)