दुर्दैवाने औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण द्यावं लागतं, पण त्याचं महिमामंडन...; फडणवीसांची रोखठोक भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 16:06 IST2025-03-17T16:05:52+5:302025-03-17T16:06:49+5:30
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांबाहेर आंदोलन केलं जात आहे.

दुर्दैवाने औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण द्यावं लागतं, पण त्याचं महिमामंडन...; फडणवीसांची रोखठोक भूमिका
CM Devendra Fadnavis: औरंगजेबाच्या कबरीवरून पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोपांना धार आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केल्याने भाजप आक्रमक झालेली असतानाच मविआनेही सरकारवर पलटवार करत औरंगजेबाच्या कबरीला देण्यात आलेल्या संरक्षणावर बोट ठेवलं. यावर आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी भिवंडीतील एका कार्यक्रमात भाष्य करत दुर्दैवाने आपल्याला औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण द्यावं लागत असलं तरी या महाराष्ट्रात त्याचं महिमामंडन होऊ देणार नाही, अशी भूमिका मांडली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज भिवंडीतील मराडे पाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी ते म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जातीच्या लोकांना एकत्रित केले. शेतकरी, बलुतेदारांना एकत्र केलं. त्यांच्यात पौरुषत्व निर्माण केले. आपल्याला देव, देश, धर्मासाठी लढायला तयार केले. हे जे बीजारोपण त्यांनी केले त्यामुळेच नंतर संभाजी महाराज राजाराम महाराज, ताराराणी यांनी स्वराज्यासाठी योगदान दिले. औरंगजेबाच्या कबरीला एएसआयने ५० वर्षापूर्वी संरक्षण दिले आहे, त्यामुळे महाराष्ट्र सरकारला देखील तिथे संरक्षण देणे क्रमप्राप्त आहे. परंतु या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडन कधीच होणार नाही," असा शब्द फडणवीस यांनी यावेळी दिला.
हिंदुत्ववादी संघटनांचे आंदोलन
छत्रपती संभाजीनगर इथं असलेली क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर उखडून टाकावी, या मागणीसाठी आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांबाहेर आंदोलन केलं जात आहे. शासनाने कबर उद्ध्वस्त न केल्यास आम्ही कारसेवा करून हे काम करू, असा इशारा या संघटनांकडून देण्यात आला आहे.