सरकारच्या कारभारावर सारेच असमाधानी!
By admin | Published: December 25, 2015 03:11 AM2015-12-25T03:11:48+5:302015-12-25T03:11:48+5:30
विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत अजित पवार यांचा आरोप.
अकोला : सत्तेत येण्यापूर्वी युतीच्या नेत्यांनी लोकांना मोठ-मोठी आश्वासने दिली. सत्तेत आल्यानंतर त्यांना सर्व आश्वासनांचा विसर पडला. या सरकारच्या कामाने शेतकरी, व्यापारी, जनता यापैकी कुणीही समाधानी नाही. युतीच्या सरकारने राज्यातील जनतेचा विश्वासघात केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार रवींद्र सपकाळ यांच्या प्रचारार्थ तिन्ही जिल्ह्यातील पदाधिकार्यांची बैठक अकोला येथे गुरुवारी सकाळी रेल्वेस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना अजित पवार यांनी निधीचा गैरवापर करणार्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे आवाहन आघाडीच्या नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांना केले. त्यांनी वेळी युती सरकारच्या अपयशाचा खरपूस समाचार घेतला. रवींद्र सपकाळ यांच्याबाबत स्थानिक नसून, ते सर्वांना अपरिचित असल्याचा अपप्रचार केला जात आहे. हा आरोप खोडून काढताना पवार म्हणाले की, प्रत्येक निवडणुकीत पहिल्यांदा निवडणूक लढविणारा उमेदवार हा अपरिचितच असतो. या बैठकीला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी राज्यमंत्री वसंतराव धोत्रे, डॉ. राजेंद्र शिंगणे, राधेश्याम चांडक, भारत बोंद्रे, कृष्णराव इंगळे, आ. हर्षवर्धन सपकाळ, आ. संदीप बाजोरिया, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, ऋषिकेश पोहरे, डॉ. संतोष कोरपे, विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष तुकाराम बिरकड, श्रीकांत पिसे पाटील, माजी राज्यमंत्री रामदास बोडखे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, बुलडाण्याचे जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, वाशिमचे जिल्हाध्यक्ष अँड. दिलीप सरनाईक, चंद्रकांत ठाकरे, मदन भरगड, वाशिम जिल्हा परिषद अध्यक्ष सोनाली जोगदंड, रवींद्र सपकाळ, सचिन वाकोडे, नितीन झापर्डे आदींसह तिन्ही जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी, नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. विजय देशमुख यांनी या बैठकीचे प्रास्ताविक केले.