युनिकोडमधील मराठी प्रमाणित होईल - तावडे
By admin | Published: February 28, 2016 01:20 AM2016-02-28T01:20:32+5:302016-02-28T01:20:32+5:30
मराठीची ओळख असणारी ‘युनिकोड’ भाषा जागतिक पातळीवर नेण्याची प्रकिया सुरू करण्यात आली आहे. ‘युनिकोड कन्सेर्शियम’ या आंतरराष्ट्रीय मानक संस्थेचे सदस्यत्व
मुंबई : मराठीची ओळख असणारी ‘युनिकोड’ भाषा जागतिक पातळीवर नेण्याची प्रकिया सुरू करण्यात आली आहे. ‘युनिकोड कन्सेर्शियम’ या आंतरराष्ट्रीय मानक संस्थेचे सदस्यत्व मिळविण्याच्या कार्यवाहीस प्रारंभ झाला आहे. त्यामुळे मराठी भाषा संगणकीकरण क्षेत्रात जागतिक स्तरावर प्रमाणित होईल त्यादृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन रवींद्र नाट्यमंदिर येथे दिमाखात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि भाषा विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
मराठी भाषेचे खऱ्या अर्थाने संवर्धन करणाऱ्या अहमदनगर येथील बेबीताई गायकवाड यांना पहिला कविवर्य स्व. मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले; तसेच परदेशातून महाराष्ट्रात येऊन मराठी शिकून भाषेचा सखोल अभ्यास करणाऱ्या डॉ. मॅक्सीन बर्नसन यांना पहिला डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री.पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार पुण्याच्या कॉन्टिनेंटल प्रकाशन यांना प्रदान करण्यात आला. स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्काराने ३५ मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी मराठी भाषेची स्थित्यंतरे उलगडणारा कौशल इनामदार यांची संकल्पना असलेला ‘मराठीनामा’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. (प्रतिनिधी)
प्रा. रा.ग. जाधव यांचा निवासस्थानी गौरव
विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार हा ज्येष्ठ साहित्यिक प्रा.रा.ग. जाधव यांना जाहीर झाला आहे. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहू शकले नाहीत. मराठी भाषा मंत्री विनोद तावडे २८ फेब्रुवारी रोजी पुणे येथे प्रा. जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन हा पुरस्कार त्यांना देणार आहेत.