कर्नाटकमधील अज्ञात व्यक्तीने महाराष्ट्राच्या एसटीवर फेकला दगड, दोन्ही राज्याकडून वाहतूक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 12:22 PM2021-03-13T12:22:41+5:302021-03-13T12:26:44+5:30
Karnatak state transport Kolhapur- कर्नाटकमधील एका अज्ञात व्यक्तीने महाराष्ट्राच्या एसटी बसवर दगड फेकल्याने महाराष्ट्र- कर्नाटक राज्यातील वाद पुन्हा चिघळला आहे. कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आज पहाटे ही घटना घडली. त्यानंतर आता दोन्ही राज्याकडून एसटीची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
बेळगाव/कोल्हापुर : कर्नाटकमधील एका अज्ञात व्यक्तीने महाराष्ट्राच्याएसटी बसवर दगड फेकल्याने महाराष्ट्र- कर्नाटक राज्यातील वाद पुन्हा चिघळला आहे. कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आज पहाटे ही घटना घडली. त्यानंतर आता दोन्ही राज्याकडून एसटीची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
बेळगाव मध्ये कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या कारवर हल्ला केल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील वाद पुन्हा चिघळला आहे. बेळगावात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी काल जिल्हाप्रमुखाच्या गाडीवर हल्ला केला आणि गाडीवरील झेंडा काढून कारची तोडफोड केली. त्यानंतर कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक झाले. शिवसैनिकांनी कोल्हापूर बस स्थानकावर आंदोलन करत कर्नाटक राज्याची बससेवा बंद केली. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत कन्नड संघटनेच्या आंदोलनाला प्रत्युत्तर दिलं.
या घटनेनंतर कोल्हापूर बस स्थानकावरील महाराष्ट्राच्या बसवर आज पहाटे कर्नाटकमधील एका नागरिकाने दगडफेक केली. यामध्ये गाडीचे नुकसान झाले असून दगडफेक करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू झाले आहे. आज पुन्हा असा प्रकार घडू नये याच्यासाठी महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये एकही बस सोडली जाणार नाही. तर कर्नाटकमधून एक दिवस महाराष्ट्रात येणार नाही.
वाहतूक बंद
कर्नाटक-महाराष्ट्र वाद काही नवीन नाही. मात्र असा वाद उफाळून येतो त्यावेळी सार्वजनिक वाहतुकीला टार्गेट केलं जातं, त्यातून असे प्रकार घडत असतात. त्यामध्ये सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये म्हणून ही वाहतूक सेवा बंद केली आहे. काल दुपारी बेळगावमध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या गाडीवर हल्ला केला. हा हल्ला कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी केला होता. काही कार्यकर्ते शिवसेनेच्या शाखेकडे जाण्यासाठी निघाले होते. यावेळी एकट्या शिवसैनिकाने कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांना विरोध केला. यानंतर मराठी भाषिकांनी त्याठिकाणी निदर्शनं करून कर्नाटक प्रशासन आणि कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांविरोधात घोषणाबाजी केली.