Maratha Reservation: आकड्यात मोजता न येणारे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 04:44 AM2018-08-10T04:44:12+5:302018-08-10T04:44:42+5:30
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने ९ आॅगस्ट रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने ९ आॅगस्ट रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला. तर स्थानिक प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुटी दिली. रस्ते वाहतूक आणि बाजारपेठा बंद असल्याने शहरांमध्ये शुकशुकाट होता. महाराष्ट्र बंदला वाळूज औद्योगिक वसाहतीत लागलेल्या हिंसक वळणात ६० मोठ्या आणि १५ लहान उद्योगांचे आकड्यात मोजता न येणारे नुकसान झाले असून त्या अकल्पनीय हल्ल्याचा उद्योजक संघटनांनी गुरूवारी रात्री उशीरा पत्रकार परिषद घेऊन तीव्र निषेध केला.
सीएमआयएचे माजी अध्यक्ष प्रसाद कोकिळ यांनी सांगितले, दहशतवाद्यांसारखे हल्लेखोर आंदोलक उद्योगांमध्ये शिरले. त्यांच्या हातात शस्त्र होती. त्यांनी मनुष्यबळ विभागातील कर्मचाºयांना धमकावले. अनेक उद्योगांतील वाहने जाळली, दुचाक्यांची मोडतोड केली. जे उद्योग बंद ठेवले होते, त्यातील मशीनरींची तोडफोड केली. हा सगळा प्रकार नवीन गुंतवणूक होण्यासाठी घातक ठरणारा आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या मुख्यालयापर्यंत आजच्या घटनांची माहिती गेली आहे. डीएमआयसीमध्ये येणाºया गुंतवणुकीवर देखील याचा परिणाम होण्याची भीती आहे. ३ तास जाळपोळ, हल्ला करण्याचा प्रकार सुरू होता. जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
सिमेन्स, एन्ड्युरन्स, आकार टूल्स, आकांक्षा पॅक, एनआरबी, कॅनपॅक, के.पी.प्रेसिंग्स आदी मोठ्या कंपन्यांचे नुकसान झाले आहे. काही कंपन्यांचे शिष्टमंडळ उत्पादन आॅडीटसाठी परदेशातून आले होते. त्यांच्यासमक्ष ही तोडफोड, जाळपोळ झाली. एन्डयुरन्समध्ये तर हत्यारे घेऊन एमडीच्या कॅबिनपर्यंत हल्लेखोर गेले होते, असेही कोकिळ म्हणाले. यावेळी मसिआचे अध्यक्ष किशोर राठी, सीएमआयएचे उपाध्यक्ष कमलेश धूत, नितीन गुप्ता, गजानन देशमुख, संदीप नागोरी, अनुप काबरा आदींची उपस्थिती होती.
सर्व उद्योग संघटनांची मराठवाडा आॅटो क्लस्टर वाळूज येथे शुक्रवारी सकाळी ११ वा. बैठक बोलावण्यात आली आहे.
>आरक्षणाला उद्योजकांचा विरोध नाही
मराठा समाजाच्या आरक्षणाला उद्योजकांचा विरोध नाही. शासनाने जरी १६ टक्के आरक्षण दिले. तरी त्यातून सर्वांना रोजगार मिळणार नाही. कामगार युनियन या घटनेमागे नाहीत. उद्योगांतूनही रोजगारच मिळणार आहे. या वर्तुळात रोजगार देतांना जात-पात पाहिली जात नाही. त्यामुळे रोजगार देणाºया ठिकाणांवर हल्ला करून काय साध्य झाले, असा प्रश्न एनआयपीएमचे विश्वस्त मकरंद देशपांडे यांनी उपस्थित केला. मसिआचे अध्यक्ष राठी म्हणाले, चिकलठाण्यातील उद्योग बंद होते, शिवाय शेंद्रा येथील काही उद्योगांवर दगडफेक करून ते बंद करण्यास भाग पाडण्यात आले.
>पंढरपुरातील अन्नछत्रात जादा वेळ जेवण
बंदमुळे पंढरपुरात येण्यास भाविकांना लागत असलेला विलंब लक्षात घेऊन मंदिर समितीने महाप्रसाद वाटपाची वेळ चारपर्यंत वाढविली होती. दुपारी दोननंतर आलेल्या सर्व भाविकांचे पोटपूजन होईल याची काळजी घेण्यात आली. माढा तालुक्यात भीमानगर चौक येथे पुणे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. त्यानंतर महामार्गावरच पंगत सुरू होती. याशिवाय आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांसाठी गावागावात जेवणाची सोय करण्यात आली होती.
>शिर्डीमध्ये जय भीम तरुण मंडळाचे अन्नदान
साईबाबांच्या शिर्डीजवळ निमगाव-निघोज येथे बायपासच्या तोंडावर रास्तो रोको करण्यात आला. मराठा कार्यकर्त्यांना जयभीम तरुण मंडळाच्या वतीने जेवण देण्यात देण्यात आले. यासाठी रस्त्यातच पंगत बसविण्यात आली होती. भोजनात गुळाचा शिरा, मसाले भात असा मेनू होता. हा स्वयंपाक रस्त्यावरच बनवण्यात आला़ दोन हजारांहून अधिक आंदोलकांनी येथे पोटपूजा केली.
>मुक्ताईनगरला खिचडीचा पाहुणचार
जळगाव/धुळे - मुक्ताईनगर येथे रास्ता रोको आंदोलनादरम्यान अडकलेल्या वाहनचालकांना खिचडीचा पाहुणचार देण्यात आला.
>विदर्भातही उठली पंगत
यवतमाळ - उमरखेड तालुक्यातील मराठा बांधवांनी नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गावरील वाहतूक मार्लेगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले. महामार्गावर वाहनांची मोठी रांग लागली होती. आंदोलनामुळे अडून पडलेल्या वाहनधारकांना, प्रवाशांना, मजुरांना आंदोलक मराठा बांधवांतर्फे भोजनाची व्यवस्था करण्यात आली. सर्वांना पंगतीत बसवून जेवण देण्यात आले.
>मराठवाड्यात प्रवाशांना खिचडीचे वाटप
हिंगोली जिल्ह्यातील कौठा (ता. वसमत) येथील आसना नदीच्या पुलावर अडकलेल्यांना आंदोलकांनी खिचडीचे वाटप करण्यात आले. नांदापूर येथील टी पॉइंटवर रस्त्यावर ट्रॅक्टर आडवे लावून रस्त्यावर खिचडी शिजविण्यात आली. बीड जिल्ह्यातील कुंबेफळ येथे रस्त्यावर स्वयंपाक करून पंगत बसवून आंदोलन करण्यात आले.