‘विनाअट क्षमा मागा, नाही तर कारवाई!’
By admin | Published: July 15, 2017 02:12 AM2017-07-15T02:12:35+5:302017-07-15T02:12:35+5:30
दोन दिवसांपूर्वी ‘प्रजा’ या स्वयंसेवी संस्थेने आरोग्यविषयक श्वेतपत्रिका प्रकाशित केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दोन दिवसांपूर्वी ‘प्रजा’ या स्वयंसेवी संस्थेने आरोग्यविषयक श्वेतपत्रिका प्रकाशित केली. या श्वेतपत्रिकेनुसार मुंबईला साथीच्या आजारांचा विळखा असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला असून, रुग्णांच्या संख्येतही वर्षानुवर्षे वाढ होते आहे, असे म्हटले होते. या प्रकरणी आता मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने कठोर भूमिका घेत, ‘प्रजा’ संस्थेने विनाअट क्षमा मागून जाहीर खुलासा करण्याची मागणी केली आहे, तसे न केल्यास, कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. याविषयी लेखी निवेदन पालिकेच्या आरोग्य विभागाने प्रजा संस्थेला पाठविले आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे उपलब्ध करून दिलेल्या सांख्यिकीय माहितीचे विश्लेषण करताना, ते कसे करावे, याबाबत संबंधित कार्यक्रम अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यायला पाहिजे होता, त्यामुळे या माहितीचे विश्लेषण योग्य प्रकारे होऊ शकले असते, असे पालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. या अहवालाच्या माध्यमातून सार्वजनिक संस्थेची प्रतिमा मलिन करून, नागरिकांची दिशाभूल करण्याचा उद्देश असल्याचा आरोपही पालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे.