उद्योजक मायनिंग लीजसाठी अनुत्सुक
By admin | Published: January 30, 2016 01:14 AM2016-01-30T01:14:17+5:302016-01-30T01:14:17+5:30
कोळसा मंत्रालयाने गेल्या वर्षी २९ खाणी लिलावात दिल्या असल्या तरी त्यापैकी फक्त सात खाणींमध्ये आजपर्यंत कोळसा उत्पादन सुरू झाले आहे व २२ खाणींचे उत्पादन प्रलंबित आहे; अशी स्पष्ट कबुली
- सोपान पांढरीपांडे, नागपूर
कोळसा मंत्रालयाने गेल्या वर्षी २९ खाणी लिलावात दिल्या असल्या तरी त्यापैकी फक्त सात खाणींमध्ये आजपर्यंत कोळसा उत्पादन सुरू झाले आहे व २२ खाणींचे उत्पादन प्रलंबित आहे; अशी स्पष्ट कबुली कोळसा मंत्रालयाने लोकमतला दिलेल्या उत्तरात दिली आहे.
उत्पादन सुरू झालेल्या खाणी १) तालाबिरा-क, २) सारिसाटोली, ३) बेलगाव, ४) मंडला-उत्तर, ५) अमेलिया- उत्तर, ६) चोथुआ ७) गरे पाल्मा-कश्(4) या खाणींमध्ये कोळसा उत्पादन सुरू झाले असल्याची माहिती कोळसा मंत्रालयाने दिली.
उत्पादन प्रलंबित असलेल्या खाणी
ज्या २२ खाणींमधून अजून उत्पादन सुरू झालेले नाही त्यांची नावे पुढीलप्रमाणे-
१) सियाल-घोघरी (मध्य प्रदेश) २) कठौतिया (झारखंड), ३) मरकी-मांगली-ककक (महाराष्ट्र), ४) ट्रान्स-दामोदर (पश्चिम बंगाल), ५) अर्धग्राम (पश्चिम बंगाल), ६) टोकीसुद-उत्तर (झारखंड), ७) गरे पाल्मा-कश्(5) (छत्तीसगड), ८) बिचारपूर (मध्य प्रदेश), ९) गरे पाल्मा-कश्(7) (छत्तीसगड), १०) जितपूर (झारखंड), ११) बिंद्रा (झारखंड), १२) सासल (झारखंड), १३) मोईत्रा (झारखंड), १४) मंदाकिनी (ओडिशा), १५) मेरल (झारखंड), १६) नरेड-मालेगाव (महाराष्ट्र), १७) डुमरी (झारखंड), १८) गणेशपूर (झारखंड), १९) मंडला-दक्षिण (मध्य प्रदेश), २०) गरे पाल्मा- कश् (8) (छत्तीसगड), २१) उत्कल-सी (ओडिशा) व २२) लोहारी (झारखंड).
याचबरोबर किती खाणींचा लिलाव रद्द झाला आहे व उत्पादनातील विलंबाचे कारण काय, या प्रश्नांना उत्तरे देताना मंत्रालयाने एका खाणीचा लिलाव रद्द झाला असून उत्पादनातील विलंबासाठी विशिष्ट असे कारण नाही असे म्हटले आहे.
वस्तुस्थिती काय आहे?
- लोकमतने केलेल्या चौकशीत कोळसा खाणी घेतलेल्या उद्योजकांपैकी बहुसंख्य उद्योजक खाणींचा ताबा घेण्यासाठी किंवा मायनिंग लीज घेण्यासाठी अनुत्सुक असल्याचे समोर आले आहे.
- याचे एकमेव कारण म्हणजे खाणींचा लिलाव करण्यासाठी सरकारला गेल्या वर्षी माईन्स अॅण्ड मिनरल्स (रेग्युलेशन) अॅक्टमध्ये सुधारणा करावी लागली होती. ही सुधारणा करताना सरकारने मायनिंग लीजसाठी लागणारी स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी तब्बल १०० पटीने वाढविली होती. ही अवाढव्य स्टॅम्प ड्युटी भरणे उद्योजकांना परवडणारे नाही त्यामुळे उद्योजक खाणींचा ताबा घेण्यासाठी किंवा मायनिंग लीज घेण्यासाठी अनुत्सुक आहेत.
विश्वसनीय सूत्रांनुसार या अतिप्रचंड स्टॅम्प ड्युटीमुळे लोढा उद्योग समूहाच्या क्रेस्ट स्टील अॅण्ड एनर्जी लिमिटेडने त्यांना मिळालेल्या कोळसा खाणीचा लिलावच रद्द केला आहे. या कंपनीने स्पर्धात्मक लिलावात छत्तीसगडमधील भास्करपारा कोळसा खाण आॅगस्ट-२०१५ मध्ये घेतली होती. पण स्टॅम्प ड्युटीच्या दडपणामुळे कंपनीने दोनच महिन्यांत म्हणजे आॅक्टोबर-२०१५ मध्ये हा लिलाव रद्द केला.
एवढेच नव्हे तर, उद्योजकांचा कोळसा खाणी घेण्याबद्दलचा अनुत्साह बघून सरकारने दुसऱ्या टप्प्यातील खाणींचा लिलावच सुरू केलेला नाही, अशीही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.