Union Budget 2022 : सर्वसामान्यांना दिलासा देणारा सर्वस्पर्शी अर्थसंकल्प - प्रविण दरेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 05:14 PM2022-02-01T17:14:54+5:302022-02-01T17:16:04+5:30
Pravin Darekar : सर्वसामान्यांना दिलासा देणारा सर्वस्पर्शी हा अर्थसंकल्प असल्याचे मत भाजपाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई : देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून बऱ्याच मुद्द्यांना स्पर्श करण्यात आला. यंदाच्या अर्थसंकल्पात आयकर आणि इतर सामान्यांशी संबंधित असलेल्या कररचनेत काहीही बदल करण्यात आले नाही. दरम्यान, सर्वसामान्यांना दिलासा देणारा सर्वस्पर्शी हा अर्थसंकल्प असल्याचे मत भाजपाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात सर्व घटकांचा सर्वव्यापी विचार करत प्रत्येक घटकांना यामध्ये अंतर्भाव करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे. अर्थमंत्र्यांच्या कार्यप्रणालीनुसार सर्वसामान्यांना दिलासा देणारा असा हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प सर्वस्पर्शी व सर्वव्यापी आहे. देशाच्या विकासाला गती मिळणार आहे, कारण गतिमानतेला यामध्ये स्थान दिलेले आहे, असे प्रविण दरेकर म्हणाले.
समाजातील सर्व घटकांसोबत शिक्षण क्षेत्राला महत्त्व देण्यात आले आहे. युवकांच्या हाताला काम मिळेल याचा सकरात्मक विचार करण्यात आला आहे. सूक्ष्म लघु उद्योगाच्या माध्यमातून २ लाख कोटी रुपये प्रस्तावित करत बेरोजगारांच्या हाताला काम देत उद्योग व स्वयंरोजगार क्षेत्रला बळकटी देण्याचा निर्धार करण्यात आला आहे, असे प्रविण दरेकर यांनी सांगितले.
याचबरोबर, सहकारी संस्थांसाठीच्या कररचनेमध्ये दिलासा देण्यात येऊन सहकार क्षेत्रात देशामध्ये आता सकारात्मक उभारणी करण्याचा मानस अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. पायाभूत मूलभूत सुविधांच्या विकासासाठी मोठी तरतूद करण्यात आल्यामुळे देशातील पायाभूत सुविधेला चालना मिळणार आहे. यामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्था बळकट करण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी दिली.