"लक्ष्मीच्या पाऊलखुणा उमटल्या...", अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे एकनाथ शिंदेंनी मानले आभार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 14:59 IST2025-02-01T14:54:00+5:302025-02-01T14:59:46+5:30
Union Budget 2025 : हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना दिलासा देणारा असून १२ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्ण करमुक्ती मिळाल्याने घराघरात लक्ष्मीच्या पाऊलखुणा उमटल्या असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

"लक्ष्मीच्या पाऊलखुणा उमटल्या...", अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे एकनाथ शिंदेंनी मानले आभार!
Union Budget 2025 : मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष २०२५-२०२६ साठीचा अर्थसंकल्प मांडला. यामध्ये त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. दरम्यान, या अर्थसंकल्पाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना दिलासा देणारा असून १२ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्ण करमुक्ती मिळाल्याने घराघरात लक्ष्मीच्या पाऊलखुणा उमटल्या असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. ते म्हणाले की, "देशाचे लोकप्रिय आणि कर्तृत्ववान पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी विकसित भारताचं पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात येणार, याची खात्री देणारा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात सामान्य नोकरदार वर्गाला जो दिलासा मिळालाय, त्याचं वर्णन अभूतपूर्व असंच करावं लागेल."
"१२ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्ण करमुक्ती मिळाल्याने आता घराघरात लक्ष्मीची पावलं उमटल्याशिवाय राहणार नाहीत. एक सर्वांगसुंदर, आत्मनिर्भर भारताला सबळ करणारा हा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मी आदरणीय केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करतो, आणि महाराष्ट्रातल्या तमाम नोकरदारांतर्फे त्यांचे आभारही मानतो", असे एकनाथ शिंदे यांनी पोस्टद्वारे म्हटले आहे.
लक्ष्मीच्या पाऊलखुणा उमटल्या...
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 1, 2025
देशाचे लोकप्रिय आणि कर्तृत्ववान पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी विकसित भारताचं पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात येणार, याची खात्री देणारा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात सामान्य नोकरदार वर्गाला जो दिलासा मिळालाय, त्याचं वर्णन अभूतपूर्व…
याचबरोबर, "शिक्षण, आरोग्य आणि कृषी या तिन्ही महत्त्वाच्या क्षेत्रांना अर्थसंकल्पातील कल्पक तरतुदींचा लाभ होणार असल्याने देशाच्या प्रगतीचा आलेख अधिकाधिक उंचावत जाणार यात शंकाच नाही. हा सशक्त भारताचा रोडमॅप आहे. दुरवस्था संपवून पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्त्वात आपला भारत देश सुबत्तेच्या दिशेनं वाटचाल करु लागल्याची ही शुभचिन्हे आहेत", असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
कर प्रणालीमध्ये मध्यमवर्गीयांना मोठे गिफ्ट
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प मांडला. हा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात सीतारामन यांनी कर बाबतीत एक मोठी घोषणा केली आहे. नवीन कर प्रणालीमध्ये १२ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर आयकर द्यावा लागणार नाही. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली होती. 'धनदेवता लक्ष्मी गरीब व मध्यमवर्गीयांना आशीर्वाद देईल, अशी मला आशा आहे, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. दरम्यान, आज कर प्रणालीमध्ये मध्यमवर्गीयांना मोठे गिफ्ट दिले आहे.