निवडणुकांसाठी संघ सक्रिय
By Admin | Published: October 2, 2014 01:04 AM2014-10-02T01:04:32+5:302014-10-02T01:04:32+5:30
एरवी राजकारणाशी आमचा काहीही संबंध नाही, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मांडण्यात येते. परंतु विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या जास्तीत जास्त जागा निवडून याव्यात यासाठी
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वयंसेवकांचा पुढाकार
नागपूर : एरवी राजकारणाशी आमचा काहीही संबंध नाही, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मांडण्यात येते. परंतु विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या जास्तीत जास्त जागा निवडून याव्यात यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकांदरम्यान ‘मोदीकारण’ करणाऱ्या संघाकडून महाराष्ट्रातदेखील त्याच धर्तीवर व्यूहरचना करण्यात आली आहे. याअंतर्गत मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. संघ परिवाराशी जुळलेल्या कुटुंबातून १०० टक्के मतदान झाले पाहिजे यासाठी स्वयंसेवक व प्रचारक कामाला लागले आहेत. ‘लोकमत’ने यासंदर्भात काही महिन्यांअगोदरच वृत्त प्रकाशित केले होते हे विशेष.
लोकसभा निवडणुकांदरम्यान भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीच व्हावे, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ठाम भूमिका घेतली होती व स्वातंत्र्यानंतर दुसऱ्यांदाच निवडणुकांमध्ये संघाचा सक्रिय सहभाग दिसून आला. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघ परिवार तसेच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दोन दिवसीय समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघ पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचना पाहता संघ विधानसभा निवडणुकांत भाजपाला सहकार्य करणार हे स्पष्ट झाले होते.
भाजपा-शिवसेना युती तुटल्यानंतर या आठवड्याच्या सुरुवातीला संघ पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत या विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सक्रियपणे सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
संघाच्या वरिष्ठ पातळीहून यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून याचा नियमितपणे आढावा घेण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
विजयादशमी उत्सव ३ आॅक्टोबरला
दरम्यान, संघाच्या विजयादशमी उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. ३ आॅक्टोबर रोजी रेशीमबाग मैदान येथे सकाळी ७.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला साधू वासवानी मिशनचे आध्यात्मिक प्रमुख व सिंधी समाजाचे आध्यात्मिक गुरू दादा.जे.पी.वासवानी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. दादा वासवानी यांचे भक्त जगभरात पसरलेले आहेत. ९६ वर्षाच्या वयात दादा वासवानी सामाजिक कार्यात अजूनही सक्रिय आहेत. वयामुळे लांब प्रवास करण्यास असमर्थ असल्याने वासवानी प्रत्यक्ष उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्या संदेशाचे यावेळी वाचन करण्यात येईल. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील. देशात सत्ताबदल झाल्यानंतर प्रथमच होणाऱ्या या विजयादशमी उत्सवासंदर्भात स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्सुकता असून जास्तीत जास्त नागरिक यावेळी सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे या सोहळ्याचे ‘डब्लूडब्लूडब्लू.व्हीएसकेनागपूर.कॉम’ या संकेतस्थळावर ‘वेबकास्टिंग’च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्याअगोदर सकाळी ६.१५ वाजता पथसंचलन होणार आहे.