संघ फूलपॅन्टमध्ये!

By Admin | Published: March 14, 2016 02:56 AM2016-03-14T02:56:55+5:302016-03-14T02:56:55+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खाकी अर्धी चड्डी हा गेल्या ९१ वर्षांपासूनचा खास ओळख बनलेला गणवेश आता काळानुरूप बदलणार आहे. खाकी हाफपॅन्टऐवजी तपकिरी रंगाची (ब्राऊन) फुलपॅन्ट या बदलत्या गणवेशात

Union flowerpants! | संघ फूलपॅन्टमध्ये!

संघ फूलपॅन्टमध्ये!

googlenewsNext

नागौर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खाकी अर्धी चड्डी हा गेल्या ९१ वर्षांपासूनचा खास ओळख बनलेला गणवेश आता काळानुरूप बदलणार आहे. खाकी हाफपॅन्टऐवजी तपकिरी रंगाची (ब्राऊन) फुलपॅन्ट या बदलत्या गणवेशात स्वयंसेवक संघ शाखांवर लवकरच दिसू लागतील.
अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या त्रिदिवसीय वार्षिक बैठकीत हा
निर्णय घेण्यात आल्याची माहिती सरकार्यवाह सुरेश भय्याजी जोशी यांनी दिली. प्रतिनिधी सभा हे रा. स्व. संघाचे सर्वोच्च धोरणात्मक मंडळ आहे.
काळाच्या ओघात ताठर न राहता आम्हीही हाफपॅन्टऐवजी तपकिरी रंगाची फुलपॅन्ट वापरण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते येथे रविवारी एका पत्रपरिषदेत म्हणाले. १९२५मध्ये स्थापना झाल्यापासून ढगळ खाकी हाफपॅन्ट हा संघ स्वयंसेवकांचा ‘ट्रेडमार्क’ बनला होता. कालौघात सदऱ्यामध्ये जुजबी बदल होत गेला; मात्र खाकी हाफपॅन्ट कायम राहिली होती.
ओळख बदलणार नाही
सध्या फुलपॅन्ट ही सामाजिक जीवनातील सर्वसाधारण बाब ठरली असून, आम्ही काळानुसार बदल केला आहे, असे भय्याजी जोशी यांनी म्हटले. तपकिरी रंगाची फुलपॅन्ट निवडण्यामागे विशिष्ट कारण नाही. ही पॅन्ट सहज उपलब्ध होत असून, दिसायला चांगली वाटते. येत्या चार-सहा महिन्यांत ही बाब सर्वसाधारण बनेल. मात्र संघ स्वयंसेवकांच्या ओळखीवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
महिलांच्या मंदिर प्रवेशाचे समर्थन... : कोणत्याही मंदिरात महिलांना प्रवेश नाकारणे अयोग्य असल्याचे रा.स्व. संघाने स्पष्ट केले आहे. मंदिर व्यवस्थापनाकडून अयोग्य प्रथा पाळल्या जात असून, महिलांना मंदिरात प्रवेश देण्याबाबत ठाम सहमतीचा अभाव दिसून येतो. असे संवेदनशील मुद्दे चर्चेतून सोडविले जावेत, आंदोलनातून नव्हे, असेही ते म्हणाले. हजारो मंदिरांत महिलांना बिनदिक्कत प्रवेश आहे. काही ठिकाणीच प्रवेशबंदीचा मुद्दा आहे. त्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज आहे. अशा मंदिरांच्या व्यवस्थापनाने या बाबी समजून घ्यायला हव्यात, असे भय्याजी जोशी म्हणाले. शनिशिंगणापूर, त्र्यंबकेश्वर येथे महिलांना प्रवेश नाकारण्यात आल्यावरून काही महिला गटांनी आंदोलन चालविले आहे.समाजातील संपन्न वर्गाला आरक्षणाची गरज नाही. पात्र मागासवर्गीयांना प्रत्यक्षात आरक्षण कोट्याचे लाभ मिळतात काय? याबाबत अभ्यास करायला हवा, असेही जोशी यांनी स्पष्ट केले. त्यांनी हरियाणातील हिंसक जाट आंदोलनाचा अप्रत्यक्ष संदर्भ दिला. हिंदू समुदाय हा जातीभेदाला कारणीभूत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत सामाजिक न्याय विचारात घेता जाती निर्मूलन होण्याची गरज आहे. अशा वर्गाने आपला हक्क सोडत कमकुवत घटकांना मदत करायला हवी, असे त्यांनी सांगितले. प्रतिनिधीसभेने पारित केलेल्या सामाजिक सलोखा, शिक्षण व आरोग्यनिगा यावरील ठरावांची जोशी यांनी माहिती दिली.
> ‘ड्रेस कोड’ बदलल्यावर संघाने आता आपली विचारसरणीसुद्धा बदलायला हवी.
-दिग्विजय सिंह, काँग्रेस

Web Title: Union flowerpants!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.