‘एनईपी’मुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व होणार उत्तुंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 02:38 PM2022-09-06T14:38:08+5:302022-09-06T14:40:07+5:30
पवई येथील ए. एम. नाईक शाळेचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे (एनईपी) केवळ पदवीधारक विद्यार्थी तयार होणार नाहीत तर उत्तुंग व्यक्तिमत्त्व तयार होतील. आणि ते जे काही करतील ते देशासाठी व जगासाठी चांगलेच करतील. आपले शिक्षण धोरण केवळ दस्ताऐवज नाही तर विद्यार्थी आणि नागरिकांची आकांक्षा यातून प्रतिबिंबित होते, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे केले.
पवई येथील ए. एम. नाईक शाळेचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. पवई येथील ए.एम. नाईक या शाळेची स्थापना लार्सन ॲण्ड टूब्रोचे समूह अध्यक्ष आणि पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी ए. एम. नाईक यांनी केली आहे. अमित शहा पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या नवीन शैक्षणिक धोरणांतून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विचार प्रतिबिंबित होतात. भारतीय परंपरेत ज्ञान आणि शिक्षा बहुआयामी होते. आता लागू करण्यात आलेले नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना पूरक असून, याद्वारे विद्यार्थ्यांची प्रतिभा आणखी बहरेल. भविष्यही आणखी उज्ज्वल होईल.
शाळेचे संस्थापक ए. एम. नाईक म्हणाले की, शाळेची स्थापना प्रामुख्याने मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी आणि नवीन पिढ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमान जागृत करण्यासाठी करण्यात आली आहे.
पालक जेव्हा आपल्या मुलांना शिक्षकांकडे पाठवतात तेव्हा ते शिक्षकांना ईश्वरासमान मानतात. ते मूल ईश्वराची देणगी असते, देशाचे भविष्य असते आणि येणारे युग घडवणारी व्यक्ती असते. या दृष्टिकोनातून त्या मुलाकडे पाहिले तर शिक्षणाचा अर्थ आपोआप स्पष्ट होतो. त्या मुलांमध्ये अनेक चांगले आणि वाईट गुण असू शकतात; पण शिक्षण देत असताना शिक्षकाने त्याच्यामधील सर्व अवगुण काढून टाकून त्या मुलांमध्ये चाणाक्षपणा, उद्यमशीलता, परिश्रम आणि परोपकार हे गुण विकसित केले पाहिजेत.
- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री