धोका देणाऱ्यांना आयोगाने सत्य दाखविले; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 12:07 PM2023-02-19T12:07:50+5:302023-02-19T12:08:11+5:30
यापुढे राज्यात मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस काम करतील असं शाह म्हणाले.
पुणे - मोदी, देवेंद्र यांचे फोटो लावून निवडणूक लढवली. नंतर मुख्यमंत्रिपदासाठी दुसऱ्याचे तळवे चाटू लागले. धोका देणाऱ्यांना निवडणूक आयोगाने शुक्रवारी ‘दूध का दूध, पानी का पानी’ करून दाखवले, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. खोट्याच्या आधारावर ते हुंकार भरत होते. धोका देणाऱ्यांना कधीही माफ करू नये, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीवर आधारित ‘मोदी ॲट २०’ या इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन शनिवारी शाह यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुस्तकाचे अनुवादक माधव भांडारी यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
शाह यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांचे कौतुक करत उद्धव ठाकरे यांचे थेट नाव न घेता त्यांना लक्ष्य केले. त्यांनी बाळासाहेबांना व शिवसैनिकांनाही धोका दिला. आम्ही मिशन घेऊन राजकारण करतो. देशाला परमवैभवाला नेण्याचे मिशन आहे. ३७० कलम काढले जाईल, राम मंदिर बांधले जाईल, तीन वेळा तलाक बंद होईल, यावर कोणी विश्वास ठेवला नसता; पण मोदी यांनी ते करून दाखविले. मोदी संवेदनशील आहेत. कोरोना काळात देशाच्या जनतेप्रती त्यांनी सहानुभूती दाखवली. पाकिस्तानात गेलेल्या भारतीय सैनिकाला मारल्यानंतर त्यांनी सर्जिकल स्ट्राइक करून धडा शिकवला.
यापुढे राज्यात मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस काम करतील. राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा आपल्याला जिंकायच्या आहेत, असे शाह म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचीही यावेळी भाषणे झाली. शाह यांनी दिवसभरात चार वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थिती लावली. भाजप कार्यकर्त्यांमध्ये त्यामुळे उत्साहाचे वातावरण होते.