"पुन्हा एकदा धनुष्यबाण आणि शिवसेना भाजपसोबत आली, उद्धव ठाकरेंना अद्दल घडवली"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 06:11 AM2023-02-20T06:11:43+5:302023-02-20T06:12:27+5:30
कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या विजयी संकल्प मेळाव्यात शाह बोलत हाेते.
कोल्हापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून आमच्यासोबत यांनी विधानसभेची निवडणूक लढवली; परंतु निकाल लागल्यानंतर काहींच्या तोंडाला पाणी सुटले आणि मी मुख्यमंत्री होणार म्हणून शरद पवार यांच्या पायाशी गेले. आता वेळ बदलली आणि पुन्हा एकदा धनुष्यबाण आणि शिवसेना भाजपसोबत आली. त्यांना एकप्रकारे अद्दल घडवली, अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येथे केली.
कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या विजयी संकल्प मेळाव्यात शाह बोलत हाेते. शाह म्हणाले, समृद्ध भारताचा पाया घालण्यासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पाठबळ देण्याची गरज आहे. यावेळी लोकसभेच्या सर्व म्हणजे ४८ जागा जिंकून शिवसेना-भाजपचे महाराष्ट्रात वर्चस्व निर्माण करा. आम्ही सत्तेसाठी लालसी नाही. आमचे आमदार जादा असतानाही एकनाथ शिंदे यांना आम्ही मुख्यमंत्री केले. आमच्यासाठी सत्ता महत्त्वाची नाही, तर महाराष्ट्राचे हित सर्वतोपरी आहे. भारतीय जनता जे प्रश्न सुटावेत म्हणून ७० वर्षे आस लावून बसली होती ते प्रश्न मोदींनी पाच वर्षांत सोडवले. शरद पवारांसह मित्रपक्षांचे सरकार असताना देशात १२ लाख कोटींचे घोटाळे झाले, असा आरोप त्यांनी केला.
तुम्ही दुधात मिठाचा खडा टाकला : उद्धव ठाकरे
केंद्रीय निवडणूक आयोगाने सरळसरळ अन्याय केला असून, चोरालाच घराचा मालक बनविण्याचा हा प्रकार आहे. याला केंद्रीय गृहमंत्री ‘दूध का दूध, पानी का पानी’ म्हणत आहेत. अजून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल यायचा आहे. तुम्ही तर दुधात मिठाचा खडा टाकला आहे, असे प्रत्युत्तर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी अमित शाह यांना दिले आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी उत्तर भारतीयांशी संवाद साधला.