अमित शाह यांच्यावर दुःखाचा डोंगर, मोठ्या बहिणीचं मुंबईत निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 04:58 PM2024-01-15T16:58:34+5:302024-01-15T16:59:47+5:30
अमित शाह यांची मोठी बहिण राजेश्वरीबेन यांचे मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
Amit Shah Sister Died : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शाह यांची मोठी बहीण राजेश्वरीबेन शाह यांचे आज मुंबईत निधन झाले. 65 वर्षीय राजेश्वरीबेन फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होत्या. महिनाभरापूर्वीच त्यांना अहमदाबादहून मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बहिणीच्या निधनानंतर अमित शाह यांनी गुजरातमधील त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
अमित शाह रविवारी रात्री मुंबईत दाखल झाले होते. शाह यांनी बहिणीवर उपचार सुरू असलेल्या खासगी रुग्णालयात जाऊन बहिणीच्या तब्येतीची विचारपूस केली. शाह आणि मुख्यमंत्री शिंदे हॉस्पिटलमध्ये येताच परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. रात्री अमित शाह यांच्यासोबत त्यांचे काही नातेवाईकही होते. शाह हे जवळपास 2 तास हॉस्पिटलमध्ये बहिणीसोबत होते. अमित शाह यांना भेटण्यासाठी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानीही हजर होते. शाह यांचा खासगी दौरा असल्याने ते इतर कुणालाही न भेटता पुन्हा दिल्लीला रवाना झाले. आज त्यांच्या बहिणीच्या निधनाची बातमी समोर आली.
केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या भगिनी श्रीमती राजेश्वरीबेन शाह यांचे आज मुंबईत दुःखद निधन झाले. त्यांचे जाणे हे समस्त शाह कुटूंबियांसाठी अत्यंत धक्कादायक आहे. या दुःखात मी व्यक्तिशः सहभागी असून या धक्क्यातून सावरण्याचे बळ आदरणीय अमितभाई आणि समस्त शाह कुटूंबियांना मिळो हीच…
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 15, 2024
एकनाथ शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली
अमित शाह यांच्या बहिणीच्या निधनाची माहिती मिळताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शोक व्यक्त केला आहे. राजेश्वरीबेन यांचे जाणे हा संपूर्ण शाह कुटुंबीयांना मोठा धक्का असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, मी वैयक्तिकरित्या या दु:खात सहभागी आहे आणि अमितभाई आणि संपूर्ण शहा कुटुंबीयांना हा धक्का सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना, असे शिंदे म्हणाले.