Raosaheb Danve: “केंद्र कोळसा देत नसेल, तर ठाकरे सरकारने परदेशातून खरेदी करावा”; रावसाहेब दानवेंनी सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 18:11 IST2022-04-13T18:10:24+5:302022-04-13T18:11:38+5:30
Raosaheb Danve: केंद्राला द्यायचे कोळशाचे ३ हजार कोटी रुपये ठाकरे सरकारकडे थकीत असल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

Raosaheb Danve: “केंद्र कोळसा देत नसेल, तर ठाकरे सरकारने परदेशातून खरेदी करावा”; रावसाहेब दानवेंनी सुनावले
जालना: राज्यावर भारनियमनाचे संकट ओढावले असून, यासाठी कोळसा टंचाई कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोप होऊ लागले असून, केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यांना कोळसा पुरविण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असून, ती केंद्र सरकारने पार पाडली आहे. ज्यावेळेस केंद्राकडे कोळशाची उपलब्धता होती, तेव्हा राज्य सरकारने कोळशाची मागणी करून त्याची साठवणूक केली नाही. आता कोळसा संपत आल्यानंतर राज्य सरकार केंद्राच्या नावाने ओरडत असेल तर त्यांनी बाहेर देशातून कोळसा आणावा, असे खडेबोल रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारला सुनावले आहे.
केंद्र सरकारकडून राज्यांना बाराशे ते दोन हजार रुपये या दराने कोळशाचा पुरवठा केला जातो. केंद्राने वारंवार राज्यांना कोळशाची मागणी करून त्याची साठवणूक करण्याचे सूचित केले होते; परंतु महाराष्ट्र सरकारने तसे केले नाही. त्यामुळे राज्यात कोळशाची टंचाई निर्माण झाल्याचा आरोप दानवे यांनी यावेळी केला.
खुल्या बाजारातून वीज खरेदी करा
शेतकरी व उद्योजकांची गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने कोळशाची साठवणूक करायला हवी होती; परंतु या सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे राज्यातील वीज पुरवठ्याचे नियोजन होऊ शकले नाही. राज्य सरकारकडे कोळशाचे ३ हजार कोटी रुपये थकीत असल्याचे सांगत राज्य सरकारने खुल्या बाजारातून वीज खरेदी करावी, असे यावेळी दानवे यांनी सांगितले.