राऊतांच्या इशाऱ्यानंतर नारायण राणेंचं खुलं आव्हान; आज तर आजच, उद्या म्हणाल तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 12:54 PM2023-01-07T12:54:36+5:302023-01-07T12:55:19+5:30
राज्याच्या विकासाबाबत काय बोलतात? तोंडाला येईल ते बोलतात. आजच्या राजकारणात संजय राऊत हा जोकर आहे अशी टीका राणेंनी राऊतांवर केली.
मुंबई - तू कोणाला चॅलेंज देतोय? संजय राऊतांनी केलेले एक तरी धार्मिक, सामाजिक, धोरणात्मक कार्य केलंय ते दाखवा. एकटा फिरा. मला संरक्षण मी मागितलेले नाही. ९० सालापासून संरक्षण आहे. मी शिवसेना वाढीसाठी ज्यांच्याविरोधात लढलो त्यांच्यापासून संरक्षण आहे. राऊत तू जिथे बोलशील तिथे यायला तयार, संरक्षण मी इथेच सोडतो. बघूया असं प्रतिआव्हान नारायण राणेंनी संजय राऊतांना दिले आहे.
नारायण राणे म्हणाले की, माध्यमाला केवळ संजय राऊत हवेत. त्याची विकृती लोकांना दाखवण्याचं काम माध्यम करतेय हे योग्य नाही. शिवसेनेच्या पहिल्या ३९ वर्षात पक्ष वाढवण्यासाठी आणि सर्वकाही करण्यासाठी नारायण राणे शिवसेनेत होता. मी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली नाही. संजय राऊतांनी घेतलीय. आज जो आनंद राऊतांना होतोय तो शिवसेना संपवल्याचा. ५६ आमदारांपैकी आता १२ आमदार उरलेत अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.
तसेच हे राज्य शिवकल्याणकारी व्हावं. या राज्यात येणारा उद्योगपती, नागरीक सुरक्षित राहो. जनतेला सुखी, समाधानी ठेवण्यासाठी आमचं सरकार काम करतेय. त्यांचे काम, कार्य दाखवा. सकाळी उठल्यापासून केवळ टीका. संजय राऊत लोकांच्या हिताचं काय बोलतात? राज्याच्या विकासाबाबत काय बोलतात? तोंडाला येईल ते बोलतात. आजच्या राजकारणात संजय राऊत हा जोकर आहे. काही काम त्याच्याकडे नाही. शिव्या घालण्यापलीकडे काही नाही अशी खिल्ली राणेंनी राऊतांची उडवली आहे.
मी उद्धव ठाकरेंना भेटणार अन्...
दरम्यान, मी केंद्रीय मंत्री आहे. मी अख्ख्या राज्यात फिरतो. उद्योग आणि रोजगार वाढवण्यासाठी काम करतो. मी उद्धव ठाकरेंना एक ना एक दिवस भेटणार. मी खासदार झाल्यानंतर माझ्याबाजूला संजय राऊत येऊन बसायचा आणि त्यावेळी राऊत उद्धव-रश्मी ठाकरेंबाबत जे काही सांगायचा ते उद्धव ठाकरेंना सांगणार. चपलेने नाही मारले तर मला विचारा. हा शिवसेना वाढवणारा नाही तर संपवणारा आहे. मातोश्रीला सुरुंग लावणारा विष आहे. तो ज्याच्या अंगावर, खांद्यावर हात टाकेल तो खांदा गळलाच समजा. हा विषारी प्राणी आहे.
त्यामुळे मला परत संजय राऊतांबाबत विचारू नका. एकदिवस तरी संरक्षण सोडून मी संजय राऊतांसमोर जाणार. माझा इतिहास शिवसेना घडवण्यामध्ये आहे शिवसेना संपवण्यामध्ये नाही. माझ्या वाटेला येऊ नको. आज तर आज, उद्या म्हणाल तर मी उद्या त्रिपुराला आहे. राज्याच्या विकासाबद्दल बोला, लोकांच्या रोजीरोटीबद्दल बोला. बेरोजगारी घालवण्यासाठी काम करूया. मागील ८ वर्षात मोदी सरकारने ३० योजना लोकांपर्यंत पोहचवलेल्या. गरिबांना मोफत धान्य देण्याची योजना आणली. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर किती शिवसैनिकांचे संसार या शिवसेनेने घडवले आणि उद्ध्वस्त केले हे जाहीर करा असं आवाहनही नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना दिले आहे.