"त्याला मराठ्यांचा नेता मानत नाही, मोदी महाराष्ट्रात येतील तेव्हा...", नारायण राणेंचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 12:43 PM2024-02-14T12:43:57+5:302024-02-14T12:50:27+5:30
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. १० तारखेला सुरु झालेल्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून जरांगेंची प्रकृती खालावली आहे. त्यात राज्यात सध्या राजकारणात बऱ्याच उलथापालथी आणि राज्यसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. अशातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटलांवर बोचरी टीका केली आहे. जरांगेंनी मोदींना राज्यात फिरू न देण्याचा इशारा दिल्यानंतर राणे संतापले.
नारायण राणेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्याला मी मराठ्यांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्याने आता मर्यादा ओलांडली आहे. पंतप्रधान जेव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरुन हलून दाखव. तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत.
मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्याला मी मराठयांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्याने आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय…
— Narayan Rane (@MeNarayanRane) February 14, 2024
जालनाच्या अंतरवाली सराटी इथे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती ढासळताना पाहून उपस्थित ग्रामस्थ, महिला आणि लहान मुलांनीही त्यांना निदान पाणी तरी प्या अशी गळ घातली. जरांगे-पाटील यांनी उपचार घेण्यासही नकार दिला. त्यांनी किमान पाणी तरी प्यावे, यासाठी महिलांसह ग्रामस्थांनीही विनवणी केली. परंतु, जरांगे त्यांनाही नकार देत आहेत. विशेष म्हणजे, उपोषण स्थळाशेजारी राहणारी दीड वर्षीय काव्या या चिमुकलीनेही एक तास जरांगे-पाटील यांच्याजवळ बसून मनोजमामा, पाणी घ्या अशी विनवणी केली.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अतिशय खालावल्याने राज्यातील मराठा समाज चिंतेत आहे. आम्ही सर्वच नाही तर संपूर्ण समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे व आपल्या विषयी समाजाच्या मनात कसली ही शंका नाही. यात चिंतेतून समाजातील विविध संघटनांनी त्यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे. आपणा शिवाय आम्हास कुणी वाली नाही, आरक्षणाची लढाई सुरूच राहील, आपण औषधोपचार घ्यावेत असे आवाहन मराठा मेडीकोज, महाराष्ट्र राज्यने पत्राद्वारे केले आहे.