Narayan Rane: “देशाबरोबर महाराष्ट्रात पुढील ५० वर्षे भाजपाची सत्ता कायम राहील”: नारायण राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 11:46 AM2022-05-23T11:46:30+5:302022-05-23T11:47:11+5:30
Narayan Rane: २०२४ ला महाराष्ट्रात भाजपचेच सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला आहे.
Narayan Rane: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथाकडे वाटचाल करत असताना महाराष्ट्रातील सरकार मात्र राज्य लुटण्याचे काम करत आहे. हे सरकार जाऊन महाराष्ट्रात भाजपाचे सरकार येईल. देशाबरोबर महाराष्ट्रात पुढील ५० वर्षे भाजपाची सत्ता कायम राहील, असा विश्वास केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या तारखा दिल्या जात असून, नारायण राणे यांनीही यापूर्वी अशा प्रकारची भाकिते केली आहेत. यावरून नारायण राणे यांच्यासह भाजपवरही सत्ताधाऱ्यांनी टीका केली आहे.
सिंधुदुर्गात बोलताना नारायण राणे यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीतील नेत्यांवर जोरदार प्रहार केला. तसेच केंद्रातील मोदी सरकारच्या कामाचे विशेष कौतुक केले. शिवसेनेची तेव्हाची भूमिका आणि आताची भूमिका बदलली आहे. ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. ही बकरी सेना झाली आहे, या शब्दांत नारायण राणे यांनी घणाघाती टीका केली आहे.
सरकारी पैसे कधीतरी येतात
भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे म्हणाले की, नारायण राणेंनी ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्ण केला. जिल्हाधिकारी यांनी खासदार निधीतुन होणाऱ्या बंधारा उभारणी कामास एका मिनिटात मंजुरी दिली. जिल्हाधिकारी यांनी जनतेसाठी दाखवलेली तत्परता आमदार वैभव नाईक यांना आठ वर्षात दाखवता आली नाही. नारायण राणेंनी निधी आणला त्यानंतर आमदारला जाग आली. मात्र कमिशन घेऊन कामे सुरू आहेत. एवढ्या छोट्या मनाचा आमदार महाराष्ट्रात पाहिला नाही. सरकारी पैसे कधीतरी येतात आणि कामे होतात. यापलीकडे आमदाराचे काम नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केली. तसेच २०२४ ला महाराष्ट्रात भाजपचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. विकासकामे भाजपच्या माध्यमातून झाली आणि यापुढेही होतच राहतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.