एकनाथ शिंदे नाराज होणं स्वाभाविक, त्यांच्यावर 'ही' जबाबदारी सोपवा; आठवलेंची नवी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 04:07 PM2024-12-02T16:07:59+5:302024-12-02T17:09:17+5:30
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एक नवी मागणी केली आहे.
Ramdas Athavale ( Marathi News ) : राज्यातील नवीन सरकारचा शपथविधी ५ डिसेंबर रोजी मुंबईत होणार असल्याचं निश्चित झालं असलं तरी मुख्यमंत्री कोण होणार आणि खातेवाटप कशा प्रकारे केलं जाणार, याबाबतची स्पष्टता अद्याप आलेली नाही. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नव्या सरकारमध्ये कोणत्या भूमिकेत दिसणार, याबाबतही तर्क-वितर्क लढवले जात आहेत. अशातच महायुतीतील घटकपक्ष असलेल्या आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एक नवी मागणी केली आहे.
"एकनाथ शिंदे यांनी नाराज होणं स्वाभाविक आहे. कारण ते मागील अडीच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते आणि आता पुन्हा संधी मिळणार की नाही, याबाबत त्यांना शंका आहे. मात्र असं असलं तरी विकासाच्या मुद्द्यावर महायुतीचं सरकार बनायला हवं, अशी त्यांची भूमिका आहे. एकनाथ शिंदे हे स्वत: उपमुख्यमंत्री होतील, असं मला वाटत नाही. मात्र त्यांना महायुतीचे अध्यक्ष म्हणून काम पाहावं. या माध्यमातून ते सरकारवर नियंत्रण ठेवू शकतात. त्यामुळे त्यांना हे पद द्यावं, असं मला वाटतं," अशी भूमिका रामदास आठवले यांनी मांडली आहे.
एकनाथ शिंदे यांना डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत अद्यापही सुधारणा न झाल्याने त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे ते ठाण्यातील शुभदीप या बंगल्यावर आराम करीत आहेत. ताप आणि थ्रोट इन्फेक्शन झाल्याने त्यांना डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेल्या आमदारांना त्यांच्याबरोबर चर्चा न करताच परतावे लागले.
दरम्यान, मागील दोन दिवस ते आरामासाठी आपल्या दरे येथील गावी गेले होते. त्यानंतर रविवारी पुन्हा ते ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले. सध्या राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्रिपदाबरोबरच इतर पदांसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यातही शिंदेंच्या शिवसेनेला गृहमंत्रिपद मिळावे यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत.