उन्होंने हवा कर दी सर! जनआशीर्वाद यात्रेत राणेंना बड्या नेत्याचा फोन; संवाद व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 01:42 PM2021-08-28T13:42:22+5:302021-08-28T13:46:49+5:30
नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात असताना बड्या नेत्याचा फोन
सिंधुदुर्ग: केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. राणेंच्या अटकसत्रानंतर शिवसेना वि. राणे वाद आणखी तापला. दोन्ही बाजूंमध्ये वाकयुद्ध सुरू झालं. अद्यापही वाकयुद्ध सुरूच आहे. राणेंना अटक करायला पोलीस आले असताना त्यांची प्रकृती थोडी बिघडली होती. त्यांना रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास झाला. मात्र कालपासून राणेंची जनआशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू झाली.
कालपासून राणे त्यांचं होमग्राऊंड असलेल्या सिंधुदुर्गात आहेत. आज यात्रा सुरू असताना राणे व्यासपीठावर होते. त्यावेळी त्यांना संरक्षणमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते राजनाथ सिंह यांचा फोन आला. राजनाथ यांनी राणेंच्या प्रकृतीची विचारपूस केली. राणे व्यासपीठावर असल्यानं तिथे माध्यमांचे कॅमेरे होते. त्यामुळे सिंह आणि राणे यांच्यातला संवाद कॅमेऱ्यात कैद झाला.
आपली प्रकृती अतिशय उत्तम असल्याचं राणेंनी सिंह यांना सांगितल. 'माझी तब्येत आता चांगली आहे. मी रुग्णालयात ऍडमिट नव्हतो. मी रुग्णालयात गेलोच नाही. यात्रा पुन्हा सुरू झाली आहे. आताही मी यात्रेतच आहे. तब्येत बरी नसल्याची हवा त्यांनी केली होती,' असं राणेंनी सिंह यांना सांगितलं. प्रकृतीची विचारपूस केल्याबद्दल त्यांनी सिंह यांचे आभारदेखील मानले.