भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 02:40 PM2024-09-30T14:40:50+5:302024-09-30T14:49:05+5:30
Ramdas Athawale News: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे रामदास आठवले यांनी मागण्यांची यादी दिली असून, राज्यात महायुतीला १६० जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
Ramdas Athawale News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. जागावाटपावरून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. यातच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी भाजपाकडे आपल्या मागण्या मांडल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एक आठवड्यापूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना २० ते २१ जागांची यादी सोपवली आहे. त्यापैकी किमान ८ ते १० जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. जागा किती लढणार याची संख्या कमी जास्त होऊ शकते. मात्र, राज्यातील सत्तेत वाटा मिळाला पाहिजे. राज्यपाल नियुक्त कोट्यातून जे १२ आमदार विधानपरिषदेवर पाठवले जातात. त्यापैकी एक जागा आरपीआयला मिळावी. याशिवाय २ ते ३ महामंडळे मिळाली पाहिजेत, अशी विविध मागण्यांची यादी रामदास आठवले यांनी ठेवल्याचे सांगितले जात आहे.
राज्यात महायुतीला १६० जागा मिळतील
लोकसभा निवडणुकीसारखे वातावरण आता राज्यात नाही. आरपीआय आठवले गट महायुतीसोबत राहणार आहे. राज्यात महायुतीला १६० जागा मिळतील. लोकसभेला जे नुकसान झाले ते न होता विधानसभेला फायदा मिळेल, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला. तर, लाडकी बहीण योजनेचा प्रभाव या निवडणुकीत दिसू शकेल, असे आठवले यांनी म्हटले आहे. तसेच राज्यात होऊ घालत असलेल्या तिसऱ्या आघाडीबाबत रामदास आठवले यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.
दरम्यान, बच्चू कडू यांनी आमच्यासोबत राहायला हवे. आम्ही तिसऱ्या आघाडीत जाणार नाही. कारण त्या आघाडीचा काहीच उपयोग नाही. एकट्याने लढल्यावर विजय शक्य नसतो. त्यासाठी तुमच्याकडे आघाडी असेल तर तुम्ही जास्त यशस्वी ठराल. आम्ही ज्यांच्यासोबत असतो त्या आघाडीचा विजय निश्चित असतो, असे रामदास आठवले म्हणाले.