“विरोधकांमुळे लोकशाही धोक्यात, चर्चेऐवजी अधिवेशनात गोंधळ निर्माण करतात”: रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 08:28 PM2023-12-21T20:28:50+5:302023-12-21T20:29:13+5:30
Ramdas Athawale News: आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीएला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
Ramdas Athawale News ( Marathi News ): संसदेतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांचा आकडा आता १४६ वर गेला आहे. संसद सुरक्षा त्रुटी, खासदारांचे निलंबन यांवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. गृहमंत्री आणि पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही सभागृहात येऊन निवेदन, स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. संसद परिसरात निदर्शने केली. मात्र, केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे. विरोधकांमुळेच लोकशाही धोक्यात आहे. तसेच अधिवेशनात चर्चा करण्याऐवजी विरोधक गोंधळ निर्माण करतात, असे प्रत्युत्तर रामदास आठवले यांनी दिले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, देशाचे संविधान मुळीच बदलले जाणार नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संविधानावर विश्वास आहे. संसद भवनाला संविधान सदन असे नाव देण्यात आले. त्यामुळे संविधान बदलण्याच्या गोष्टीत काहीही तथ्य नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीएला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावा रामदास आठवले यांनी यावेळी बोलताना केला.
विरोधकांमुळेच लोकशाही धोक्यात
विरोधकांमुळेच लोकशाही धोक्यात आली आहे. सरकारवर टीका करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. विरोधक चर्चा करण्याऐवजी अधिवेशनात गोंधळ निर्माण करतात. वेलमध्ये उतरून खासदारांनी घोषणाबाजी करणे चुकीचे आहे, अशी टीका रामदास आठवले यांनी केली. सर्वधर्माच्या लोकांचा आदर केला पाहिजे. हे भारतीय संविधानच सांगते. त्यामुळे राम जन्मभूमीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण आल्यास आपण जाऊ. राम जन्मभूमीसाठी मुस्लीम समाजानेही सहकार्य केले. त्यांनाही पाच एकर जमीन देण्यात आली, असे रामदास आठवले यांनी सांगितले.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले की, मराठा समाजातील सर्वच लोक श्रीमंत नाही. त्यामुळे मराठा समाजातील गरिबांना आरक्षण मिळावे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. त्यांच्या मागणीप्रमाणे सरसकट दाखले देऊन प्रश्न सुटणार नाही. जरांगे यांनी राज्य सरकारला वेळ द्यायला हवा. सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.