Maharashtra Politics: “निवडणूक आयोग बरखास्त करून संजय राऊतांना नेमायचे का? २ हजार कोटींबद्दल त्यांनाच विचारा”
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 10:36 PM2023-02-20T22:36:27+5:302023-02-20T22:37:13+5:30
Maharashtra News: लोकशाहीप्रमाणे उद्धव ठाकरेंनी पक्षातील निवडणुका घेतल्या नाहीत. तेच खरे हुकुमशाह आहेत, असा पलटवार रावसाहेब दानवेंनी केला.
Maharashtra Politics: उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर अद्याप अंतिम निर्णय येणे बाकी असताना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल देत ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आले. यानंतर यासंदर्भात राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया येत आहेत. यातच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी भाजपवर केलेल्या टीकेचा केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला. चिंचवड येथे प्रचारासाठी आलेल्या दानवे यांनी माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिले.
२०२४ ची निवडणूक शेवटची ठरू शकते. देशात हुकुमशाही लागू शकते, अशी जोरदार टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. यावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, उद्धव ठाकरे काय बोलतात आणि त्यांचा बोलविता धनी कोण आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. हा देश लोकशाहीला मानणारा आहे. लोकशाहीविरोधात जो पक्ष काम करेल, त्यांना जनता जागा दाखवून देईल. लोकशाहीप्रमाणे यांनी कधी पक्षाच्या निवडणुका घेतल्या नाहीत. लोकांना काय लोकशाही दाखवतात, खरे हुकुमशाह हे आहेत. उद्धव ठाकरे नैराश्यातून अशी विधाने करत आहेत, असा पलटवार दानवे यांनी केला.
निवडणूक आयोग बरखास्त करून संजय राऊतांना नेमायचे का?
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला असून, निवडणूक आयोगच बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली. याबाबत रावसाहेब दानवे यांना विचारण्यात आले असता, निवडणूक आयोग बरखास्त करून संजय राऊत यांना नेमायचे का, असा खोचक सवाल दानवे यांनी केला. तसेच संजय राऊत यांनी २ हजार कोटींच्या दाव्यावर ठाम असल्याचे म्हटले आहे. यावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, संजय राऊत ठाम असले तरी न्यायालयात काय तो निर्णय होईल. २ हजार कोटी आले कुठून, दिले कोणाला, कोटींचा दावा त्यांनाच माहिती आहे, भाजपने अशा प्रकारचे व्यवहार कधीही केलेले नाहीत, असे दानवे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, चिंचवड मतदारसंघात अश्विनी जगताप निवडून येतील. लक्ष्मण जगताप यांनी खूप काम केले आहे. जनतेचा विश्वास भाजपवर आहे. सर्वांत जास्त मते अश्विनी जगताप यांना मिळतील. देशात आणि राज्यात भाजपच्या बाजूने वातावरण आहे, असे रावसाहेब दानवे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"