शिर्डीतील प्रचारसभेत नितीन गडकरींची प्रकृती पुन्हा बिघडली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 05:14 PM2019-04-27T17:14:06+5:302019-04-27T17:28:33+5:30
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकृती पुन्हा बिघडली.
शिर्डी : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकृती पुन्हा बिघडली. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार लोखंडे यांच्या प्रचारसभेत बोलताना नितीन गडकरी यांना भोवळ आली. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
याआधीही अहमदनगरमधील राहुरी कृषी विद्यापीठातील पदवीदान सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली होती. कार्यक्रमात जवळपास अर्धा तास नितीन गडकरी यांनी भाषण केले होते. यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत सुरु होण्यापूर्वी नितीन गडकरी यांना भोवळ आली होती. यावेळी रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना भोवळ आल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.
दरम्यान, नितीन गडकरी यांना मधुमेहाचा त्रास असून डॉक्टरांनी त्यांना यापूर्वीही विश्रांतीचा सल्ला दिला आहे. नितीन गडकरी सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत.