विदर्भातील अनोखी निवडणूक : नीलपंख झाला वर्धानगरीचा शहरपक्षी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 08:02 PM2018-08-22T20:02:39+5:302018-08-22T20:03:17+5:30

बहार नेचर फाउंडेशन आणि वर्धा नगर पालिका यांच्याद्वारे आयोजित शहरपक्षी निवडणुकीत सर्वाधिक मते प्राप्त करीत भारतीय नीलपंख म्हणजेच इंडियन रोलर हा पक्षी वर्धानगरीचा शहरपक्षी म्हणून निवडून आला.

Unique election of Vidarbha: Indian Roller is Vardha's City bird | विदर्भातील अनोखी निवडणूक : नीलपंख झाला वर्धानगरीचा शहरपक्षी

विदर्भातील अनोखी निवडणूक : नीलपंख झाला वर्धानगरीचा शहरपक्षी

वर्धा - बहार नेचर फाउंडेशन आणि वर्धा नगर पालिका यांच्याद्वारे आयोजित शहरपक्षी निवडणुकीत सर्वाधिक मते प्राप्त करीत भारतीय नीलपंख म्हणजेच इंडियन रोलर हा पक्षी वर्धानगरीचा शहरपक्षी म्हणून निवडून आला. तब्बल ५४ दिवस चाललेल्या या निवडणुकीची सांगता शुभंकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीलपंखाच्या विजयाने झाली. प्रख्यात पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनी मतमोजणीनंतर विजयी शहरपक्ष्याच्या नावाची रीतसर घोषणा केली. 
या निवडणुकीत एकूण ५१ हजार २६७ नागरिकांनी शहरपक्ष्याकरिता मतदान केले होते. त्यापैकी ४७ हजार ६४६ नागरिकांनी मतपत्रिकेद्वारे तर देशविदेशात स्थायिक झालेल्या ३ हजार ६२१ वर्धेकरांनी ऑनलाईन पद्धतीने मतदान केले. मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत नीलपंखने १० हजार ९४० मतांपैकी ५ हजार ९८८ मते घेत आघाडी घेतली. पाच फेऱ्यांनंतर एकूण मतांच्या ५९ टक्के मते प्राप्त केलेल्या नीलपंखाच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अंतिम फेरीनंतर नीलपंखला २९ हजार ८६५ मते तर प्रतिस्पर्धी धीवर म्हणजेच किंगफिशरला ६ हजार ९५० मते प्राप्त झाली. याशिवाय कापशी घार ४ हजार ८८६, ठिपकेवाला पिंगळा ४ हजार ८०५ तर तांबट या पक्ष्याला ४ हजार १०५ मते प्राप्त झाल्याचे घोषित करण्यात आले. केवळ विदर्भाला नव्हे तर महाराष्ट्राला उत्सुकता लागलेल्या या आगळ्यावेगळ्या निवडणुकीने नीलपंखाच्या विजयासोबतच वर्धेकरांच्या पक्षीप्रेमी व पर्यावरणस्नेही असण्यावरही शिक्कामोर्तब केले. 
सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या प्रशस्त सभागृहात आयोजित या कार्यक्रमात मारुती चितमपल्ली यांनी बहारचे सचिव दिलीप वीरखडे यांच्याकडे शहरपक्षी निवडणुकीचे प्रमाणपत्र सोपविले. यावेळी मंचावर निवडणूक निरीक्षक अतुल शर्मा, बहारचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे, मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या ५० वर्षांच्या पक्षिनिरीक्षणाच्या कारकिर्दीत प्रथमच या प्रकारचा उपक्रम अनुभवत असून बहारने राबविलेल्या शहरपक्षी निवडणूक प्रचार यंत्रणा देशभर कुठेही पहावयास मिळाली नाही. हा उपक्रमाची नोंद जागतिक स्तरावर घेतली जाईल, असे गौरवोद्गार चितमपल्ली यांनी यावेळी काढले. प्रारंभी अतुल शर्मा यांनी आपल्या मनोगतातून निवडणुकीचा आढावा घेतला. 
या मतमोजणी उपक्रमात निवडणूक अधिकारी म्हणून या उपक्रमात आर्की. रवींद्र पाटील, राहुल तेलरांधे, डॉ. जयंत वाघ, जयंत सबाने, दीपक गुढेकर,वैभव देशमुख, स्नेहल कुबडे, राहुल वकारे, राजेंद्र लांबट, रामराव तेलरांधे, संहिता इथापे, विशाल बाळसराफ, विनायक साळवे, अपूर्व साळवे, लक्ष्मीकांत नेवे, दर्शन दुधाने, सन्मित्र बोबडे, अविनाश भोळे, पराग दांडगे, प्रा. पद्माकर बाविस्कर, प्राजक्ता भोळे, डॉ. ज्योती तिमांडे, प्रा. नितीन ठाकरे, प्रवीण कलाल, नितीन हादवे, मैथिली मुळे, जान्हवी हिंगमिरे, प्राजक्ता भोळे, प्राजक्ता कदम, अनघा लांबट, तारका वानखडे, डॉ. अभिजित खनके, पार्थ वीरखडे, विजय देशमुख, सुषमा सोनटक्के, राकेश काळे, सुनंदा वानखडे, कल्याणी काळे, संगीता इंगळे, कीर्ती येंडे, रत्ना रामटेके, किरण शेंद्रे, पंकज वंजारे, मोहित सहारे, प्रा. मोनिका जयस्वाल, प्रियांका देशमुख, नम्रता सबाने, रवी वकारे, बाबासाहेब जावळे, लक्षमीप्रिया पथक, शुभम जळगावकर यांनी जबाबदारी सांभाळली. या निवडणुकीच्या अंतिम निकालाची प्रत नगराध्यक्ष अतुल तराळे व मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्याकडे सोपविण्यात आली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. किशोर वानखडे यांनीं केले तर आभार वैभव देशमुख यांनी मानले. मतमोजणीस्थळी वर्धा नगर पालिका, बहार नेचर फाउंडेशन आणि बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालय यांच्याद्वारे विशेष यंत्रणा राबविण्यात आली होती.

दि. २३ जून ते १५ ऑगस्ट या दरम्यान सलग ५४ दिवस नागरिकांमध्ये प्रचार यंत्रणा राबवित जनमताचा कौल घेण्यात आला. हा उपक्रम केवळ मतदानापुरता मर्यादित न ठेवता बहार नेचर फाउंडेशनने या काळात विविध माध्यमांद्वारे परिसरातील पक्ष्यांबाबत जनजागृती करीत छायाचित्र प्रदर्शनी, चित्रफितीद्वारे सादरीकरण, दर रविवारी पक्षिनिरीक्षण यासोबतच चला उमेदवारांना भेटू या, मगन संग्रहालयाच्या भिंतीवर पाखरांची शाळा, माझा पक्षी माझे चित्र स्पर्धा, सायकल प्रचारयात्रा, उमेदवार एका मंचावर, असे अनेक उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमातील विद्यार्थ्यांनी चितारलेल्या पक्षिचित्रांची प्रदर्शनीही मतमोजणी सभागृहात लावण्यात आली होती. 
विजेत्या शहरपक्ष्याची अधिकृत घोषणा होताच सर्वत्र जल्लोष सुरु झाला. मात्र राजकीय निवडणुकीतील हेवेदावे न करता सर्व पक्ष्यांच्या समर्थकांनी विजेत्या नीलपंख पक्ष्याचे टाळ्या वाजवून आणि घोषणा देऊन स्वागत केले. ही निवडणूक वर्धेकर नागरिकांच्या कायम स्मरणात राहणार असून विजेता शहरपक्षी नीलपंखचा पुतळा या वर्षाअखेर मुख्य चौकात लावण्यात येणार आहे.

Web Title: Unique election of Vidarbha: Indian Roller is Vardha's City bird

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.