स्वरचैतन्याची रसिकांना अनोखी अनुभूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2016 01:27 AM2016-10-31T01:27:19+5:302016-10-31T01:27:19+5:30

मस्त गुलाबी थंडी... नवचैतन्याने बहरलेला आसमंत... सप्तसुरांची मनसोक्त उधळण... अशा भारावलेल्या वातावरणात दिवाळी पहाटची स्वरमैफल रविवारी रंगली

Unique experience for vocalists | स्वरचैतन्याची रसिकांना अनोखी अनुभूती

स्वरचैतन्याची रसिकांना अनोखी अनुभूती

Next


पुणे : मस्त गुलाबी थंडी... नवचैतन्याने बहरलेला आसमंत... सप्तसुरांची मनसोक्त उधळण... अशा भारावलेल्या वातावरणात दिवाळी पहाटची स्वरमैफल रविवारी रंगली. बनारस घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. राजन व पं. साजन मिश्रा यांच्या तेजोमयी स्वरकिरणांच्या लालिमांनी चारी दिशा उजळल्या आणि मनाला शीतल थंडावा देणारी व धुक्याच्या दुलईत पहुडलेली सोनेरी पहाट सुरांमध्ये न्हाऊन निघाली.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अमजदअली खॉँ यांचे पुत्र अमान व अयान बंगश यांच्या सरोदवादनाच्या मंजूळ सुरांनी रसिकांच्या हृदयाच्या तारा छेडत अद्भुत आनंदाची अनुभूती दिली.
निमित्त होते बी. एन. अष्टेकर ज्वेलर्स प्रस्तुत कोहिनुर ग्रुपच्या सहयोगाने लोकमत ‘स्वरचैतन्य’ दिवाळी पहाट कार्यक्रमाचे. म्हात्रे रस्त्यावरील कृष्णसुंदर गार्डन येथे बोचऱ्या थंडीतही हजारो दर्दी पुणेकरांच्या उपस्थितीने कलाकारांची सकाळही अविस्मरणीय केली. सूर, लय आणि ताल अशा त्रिवेणी संगमातून साकार झालेल्या सृजनशील आविष्कारांनी वातावरणात सप्तसुरांचा अनोखा साज चढविला.
पक्ष्यांच्या गुंजनाने बहरलेल्या सृष्टीवर चैतन्यदायी सुरांचा नजराणा पेश झाला. प्रारंभी स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. पं. राजन व पं. साजन मिश्रा, अमान व अयान अली बंगश, ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई, महाव्यवस्थापक मिलन दर्डा यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने स्वरयज्ञास प्रारंभ झाला.
या वेळी बी़ एऩ अष्टेकर ज्वेलर्सचे अशोक अष्टेकर, प्रशांत अष्टेकर, पवन अष्टेकर, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, राजेश गोयल, मँगो हॉलिडेजचे मिलिंद बाबर, अदानी विल्मरचे प्रादेशिक प्रमुख शशीभूषण, कावरे आइस्क्रीमचे राजीव कावरे, कृष्णसुंदर गार्डनचे अमित गायकवाड, सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे जनरल मॅनेजर नरेंद्रसिंह, नाईक होमिओपॅथीचे डॉ़ प्रथमेश नाईक, काका हलवाई स्वीट सेंटरचे सिद्धार्थ गाढवे, आॅडी पुणेचे डेप्युटी जनरल मॅनेजर चंदन लाड, हायपर सिटीचे स्टोअर मॅनेजर सुमन पांडे, जे. डब्ल्यू. मॅरिएटचे व्यवस्थापक इंद्रनील बेनाडीकर, विक्रम चहाचे अंकुश बरोदे, समन्वय अनय गाडगीळ आदी उपस्थित होते़
अमान आणि अयान बंगश या दोघा भावांचे स्वरमंचावर आगमन होताच टाळ्यांच्या गजरात रसिकांनी त्यांचे स्वागत केले.
वडिलांकडून सरोदवादनाचा वारसा मिळूनही सरोदवादनात स्वत:चे वेगळेपण सिद्ध करणाऱ्या अमान व अयान यांनी स्वत:चा एक चाहतावर्ग निर्माण करण्यात यश मिळविले आहे. त्यांचे सादरीकरण अनुभवण्यासाठी श्रोते आतुर झाले होते.
या कार्यक्रमाचे सहयोगी प्रायोजक मॅन्गो हॉलिडेज, स्वीट पार्टनर काका हलवाई स्वीट सेंटर, टी-पार्टनर विक्रम टी, हॉस्पिटॅलिटी पार्टनर जे. डब्ल्यू. मॅरिएट, लक्झरी पार्टनर आॅडी पुणे, हेल्थ पार्टनर नाईक होमिओपॅथी, शॉपिंग पार्टनर हायपर सिटी, हायजिनिक पार्टनर फॉर्च्युन फूड आॅईल, बँकिंग पार्टनर सेंट्रल बँक आॅफ इंडिया आहेत़ तर, सहप्रायोजक कावरे आइस्क्रीम व लक्ष्मीनारायण चिवडा हे आहेत़ अमित गायकवाड यांचे कृष्णसुंदर गार्डन स्थळाचे प्रायोजक आणि आयबीएन लोकमत माध्यम प्रायोजक आहेत.(प्रतिनिधी)
>नेल फाइल करेबिना जीवन अधुरा
सतार, व्हायोलिन, गिटार यांसारखी वाद्ये बोटांनी वाजविली जातात, मात्र सरोद एक असे वाद्य आहे, जे वाजविण्यासाठी नखांचा वापर करावा लागतो. कारण बोटाने वाजवायचे झाले तर आवाज वेगळा येतो तेव्हा नखानेच वाजवावे लागते. त्यामुळे ‘नेल फाइल करे बिना जीवन अधुरा है’’ अशी मार्मिक टिप्पणी अयान बंगश
याने केली.
> सरोदच्या मोहक तारा छेडत ‘ललत’ रागापासून त्यांनी मैफलीस आरंभ केला. आलाप, जोड, झालामधून सरोदवादनाचे बहारदार सादरीकरण करीत त्यांनी रसिकांना खिळवून ठेवले. त्यांच्या प्रफुल्लित करणाऱ्या सुरांनी एका अद्भुत आविष्काराचे दर्शन घडविले. आनंदभैरव रागातील ठेक्यामधली द्रुत गतीतील बंदिश सादर करून त्यांनी रसिकांना तृप्त केले. यांना पं. सत्यजित तळवलकर आणि अनुव्रत चॅटर्जी यांनी तबल्यावर दमदार साथसंगत केली.
बनारस घराण्याच्या अभिजात गायकीचा प्रत्यय रसिकांना पं. राजन व पं. साजन मिश्रा यांच्या स्वरमैफलीत अनुभवास मिळाला. नृत्याच्या अंगाने जाणारे रागांचे भावोत्कट सादरीकरण हे त्यांच्या गायकीचे वैशिष्ट्य. त्यांच्या तेजोमयी स्वरकिरणांनी आसमंतात सोनेरी रंग पसरला आणि त्या रंगांमध्ये रसिक भान हरपले.
‘जोनपुरी’ रागात विलंबित एकतालातील ‘बाजे झनझन पायलियाँ,’ मध्य लयीत ‘जिअरा तरसे’ आणि द्रुत लयीतील ‘प्यारे कनहाई न मारो कंकरिया’ या बंदिशींच्या सादरीकरणातून मैफल सजली.
>पुण्यासारखे प्रेम कुठेच मिळाले नाही
संगीत ही आमची आराधना आहे. तिच्या पूजेसाठी पुणेकरांचे आशिष मिळणे आवश्यक आहे. पुणेकरांकडून जेवढे प्रेम मिळते तेवढे जगात इतर कुठेही मिळत नाही, अशा शब्दांत पुण्याविषयी पं. राजन व पं. साजन मिश्रा यांनी गौरवोद्गार काढले.
गुजरी तोडी रागातील ‘करम कर जब सब बन’ ही पारंपरिक रचना सादर करून त्यांनी रसिकांची वाहवा मिळविली. ‘मन के पंछी भहे बावरे’ ही बंदिश त्यांनी खुलवली आणि ‘भवानी दयाने...’ या भैरवीने त्यांनी मैफलीची सांगता केली. त्यांना पं. अरविंदकुमार आझाद (तबला), डॉ. अरविंद थत्ते (हार्मोनियम), पं. मोहनकुमार दरेकर व निकिता दरेकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सुंदर निवेदन आनंद देशमुख यांनी केले.

Web Title: Unique experience for vocalists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.