आधुनिक 'गोकूळ' नगरीची अनोखी सखूमाय
By admin | Published: October 2, 2014 12:39 PM2014-10-02T12:39:51+5:302014-10-02T12:40:44+5:30
पायपुसणेनिर्मितीचे प्रशिक्षण ते वस्तीशाळेचा प्रवास
Next
आठवी माळ - कला : पायपुसणेनिर्मितीचे प्रशिक्षण ते वस्तीशाळेचा प्रवास
गजानन दिवाण■ औरंगाबाद
अनसरवाडा. ७४0 जणांचे हे एक गावच. भीक मागायची. त्याच पैशातून दारू प्यायची. मिळालेले तुकडे खायचे. यात बायकाही मागे नसत. आंघोळ त्यांना ठाऊकच नव्हती. पिण्याचे पाणी प्रातर्विधीला वापरणे ते पाप समजायचे. घरात स्वयंपाक करून जेवण करतात, हे त्यांच्या गावीही नव्हते. सखूबाईने समाजाचा विरोध पत्करत पायपुसणे तयार करण्याची कला अवगत केली. त्याचे प्रशिक्षण इतर महिलांनाही दिले. आज प्रत्येक घरात चूल पेटते. भीक मागण्याचे प्रमाण ४0टक्क्यांवर आले आहे. आता त्यांची पोरं शाळेतही जाऊ लागली आहेत. एखाद्या जादूगाराने करावा, असा हा बदल सखूबाईच्या एका बंडाने झाला.
सखूबाई बंडीधनगर. वय वर्षे ६३. जन्म कुठला ठाऊक नाही. कर्नाटक वा आंध्र प्रदेशातला असावा. ३१व्या वर्षीच नवर्याचा मृत्यू झाला. एकूण १0 मुले. तीन गेली. सात मुले आणि एक मुलगी. मुले लहान असल्याने समाजाने कसरतीचा खेळही शिकविला नाही. मुलांचे आणि आपले पोट कसे भरणार? या समाजात पोटभर अन्न कोणालाच मिळायचे नाही. तारेवरच्या कसरती करून पैसा किती मिळणार? पोट भरेल एवढी भीक तरी कोण देणार? मग ही भूक मारण्यासाठी स्पिरीट प्यायचे. बायकांपासून पोरांपर्यंत, लहानथोर सार्यांनाच हे व्यसन. कोणी गावठी दारू पिऊन, तर कोणी स्पिरीट पिऊन भूक मारायचे. सखूबाईने आपले आणि पोराचे पोट भागविण्यासाठी हाच व्यवसाय सुरू केला. या विक्रीतून कसेबसे पोट भरायचे. गोपाळ गडकरी (पहिलवान) नावाने हा समाज ओळखला जातो. काही जण त्याला डोंबारीही म्हणतात.
१९ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. भटकत भटकत हा समाज लातूर जिल्ह्यातील अनसरवाडा (ता. निलंगा) येथे पोचला. शाळेच्या कडेलाच त्यांचा तंबू होता. याच गावातला तरुण नरसिंग झरे हा या शाळेत शिकवणी घ्यायचा. ती सुरू असताना त्यांची मुले दंगा करायची आणि पळून जायची. यामुळे त्रासलेल्या नरसिंगने या मुलांचा पाठलाग करीत त्यांचा तंबू गाठला. आईबाप आणि मुलेही दारू प्यायलेले. तक्रार कुणाकडे करायची? हे चित्र पाहून अस्वस्थ झालेल्या नरसिंगला या समाजासाठी काहीतरी करायचे, या विचाराने झपाटले. याकामी सखूबाईने त्याला मोलाची साथ दिली. कसरतीचे खेळ करताना या समाजातील काही तरुण सनई-ढोल वाजवायचे. यातील सुदाम नावाच्या तरुणाला नरसिंगने बँडचे प्रशिक्षण घेण्यासाठी हैदराबादला पाठविले. पुढे २0 जणांना त्याने प्रशिक्षण दिले. वर्षभराचा काळ गेला. गोकूळ बँजो नावाची बँड पार्टी स्थापन झाली. आता असे अनेक ग्रुप स्थापन केले आहेत. पुरुषांच्या रोजगाराचा प्रश्न मिटला, पण महिलांचे काय करायचे? सखूबाईला पुण्याला खादी ग्रामोद्योगमध्ये प्रशिक्षणासाठी पाठविण्याचे ठरले. मात्र आपली एकटी महिला समाज सोडून कुठे जाणे, या जातपंचायतीला मान्य नव्हते. हा नियम सखूबाईने मोडला. सखूबाई सहा महिने पुण्यात राहिल्या. सारे काही शिकून परतल्या. संतापलेल्या पंचायतीने सखूबाईला जातीबाहेर काढले. दीडशे रुपये दंड भरून नंतर त्यांना जातीत घेण्यात आले. सखूबाईंनी नंतर प्रत्येक महिलेला प्रशिक्षण दिले. पायपुसणे बनवण्यासह इतर कामांत या सार्या महिला गुंतल्या. त्यांनाही रोजगार मिळू लागला. वेरूळ महोत्सवात या उद्योगाला पुरस्कारही मिळाला. तयार माल मुंबई, पुणे, औरंगाबाद, हैदराबादला पाठविला जाऊ लागला.
कॉ. माणिकराव जाधव यांच्या मदतीतून येथे आठ घरे बांधण्यात आली. 'गोकूळ नगरी' असे या वस्तीला नाव देण्यात आले. पुढे मुंबईच्या एका बिल्डरने सार्यांनाच घरे बांधून दिली. १९९९मध्ये भटके विमुक्त विकास परिषदद्वारा संचलित गोविंद महाराज गोपाळ समाज विकास परिषद स्थापन करण्यात आली. सखूबाई आता या परिषदेच्या अध्यक्षा आहेत. गोपाळसमाजाच्या राज्य पंचायतीच्या त्या एक सदस्य आहेत. भटके विमुक्त विकास परिषदेच्या महिला विभागाच्याही त्या सदस्य आहेत. गोकूळ नगरीतील उद्योग, शाळा, वसतिगृह हा मोठा पसारा सखूबाईच पाहतात. २00१ मध्ये पहिली ते चौथी वस्तीशाळा सुरू करण्यात आली. या समाजातील ३0 मुलांनी सर्वात आधी शाळा पाहिली. आता या शाळेत ३३ मुले शिकतात, तर बालवाडीत ३७ मुले शिकतात. सखूबाईला शिक्षणाची ही गंगा आणखी वाहती करायची आहे. मिशन सखूबाई : भीक मागितल्यानंतर सर्व एकत्र यायचे. सारे तुकडे एकत्र करायचे. एक डोके एक हिस्सा. डोके मग ते प्राण्याचेही. घरात कुत्रे असेल तर त्याचाही वेगळा हिस्सा. गरोदर महिलेच्या पोटातील बाळालाही वेगळा हिस्सा, अशी त्यांची पद्धत. आता भीक मागण्याचे प्रमाण ४0 टक्क्यांवर आले आहे. सखूबाईला ते झीरो टक्क्यावर आणायचे आहे.
मुलांची नावे खोकल्या, गांजा.. : जागा मिळाली. नागरिकत्व मिळाले. रेशनकार्डवर नाव आले. एकेकाची तीन-तीन नावे. शाहरूख, सलमान, अमिताभ. एकाचीच ही सारी नावे. स्वत:ला नाव नाही, मग पोरांची काय ठेवायची? गांजा पिणार्याचे नाव गांजा, सतत खोकणार्याला खोकल्या. पुढे मात्र नाव ठेवण्याची पद्धतही सुरू झाली.