नृत्याविष्काराचे अनोखे सादरीकरण

By Admin | Published: February 28, 2017 02:32 AM2017-02-28T02:32:35+5:302017-02-28T02:32:35+5:30

संस्कृती कल्चरल अ‍ॅकॅडमीच्या वतीने ‘कलामंजिरी : दी ऱ्हीदम आॅफ लाइफ’ या महोत्सवाचे शानदार आयोजन करण्यात आले.

Unique presentation of dancer | नृत्याविष्काराचे अनोखे सादरीकरण

नृत्याविष्काराचे अनोखे सादरीकरण

googlenewsNext


मुंबई : संस्कृती कल्चरल अ‍ॅकॅडमीच्या वतीने ‘कलामंजिरी : दी ऱ्हीदम आॅफ लाइफ’ या महोत्सवाचे शानदार आयोजन करण्यात आले. त्याचे उद्घाटन प्रसिद्ध नृत्यांगना रूपाली देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. महोत्सवाच्या या दुसऱ्या वर्षी बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध नर्तक विशालकृष्ण यांचे कथ्थकनृत्य विशेष आकर्षण ठरले. त्यांनी अर्धनाटेश्वर, ताल-तीनताल व जयदेव रचित अष्टपदी यांचे पदलालित्य सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
बनारस घराण्याच्या पारंपरिक बंदिशी, बनारस चक्री व विशेषत: थाळीवरचे तलकार पाहून रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. दुसऱ्या प्रस्तुतीमध्ये भरतनाट्यम शैलीचे सुप्रसिद्ध नर्तक व गुरू वैभव आरेकर यांची नृत्य प्रस्तुती झाली. त्यांनी नर्मदा परिक्रमेच्या संकल्पनेवर आधारित ‘नर्मदे हर हर’ ही आध्यात्मिक अनुभूतीची नृत्यप्रस्तुती साकारली. नर्मदेचा उगम, तिच्या विविध स्थिती, तिची महती असा संपूर्ण प्रवास त्यांनी नृत्यप्रस्तुतीतून उलगडून दाखविला. सूक्ष्म अभिनय, उत्कृष्ट प्रस्तुतीतून जणूकाही रसिकांना नर्मदा परिक्रमेची अनुभूती दिली.
शास्त्रीय स्वरूपाची जोपासना आणि सेवा करणारे अनेक महान नृत्यकलावंत भारतात होऊन गेले व आजही आहेत, त्या परंपरेला अनुसरून रंगमंचावर कलेचा आविष्कार व्हावा तसेच नवीन व बुजुर्ग कलाकार यांच्या सादरीकरणाचा आविष्कार महोत्सवाच्या माध्यमातून रसिकांना अनुभवता यावा, यासाठी असे महोत्सव सातत्याने होण्याची गरज आहे रसिकांनीही त्यांना आश्रय द्यावा, असे आवाहन प्रसिद्ध नृत्यांगना रूपाली देसाई यांनी या वेळी केले. संस्कृती कल्चरल अ‍ॅकॅडमीच्या भरतनाट्यम, कथ्थक आदी शास्त्रीय नृत्यांचा प्रसार व प्रचार व्हावा, यासाठी कार्य केले जात आहे. विद्यार्थ्यांमधील नृत्याविष्कार घडविण्यासाठी त्यांच्यातील कलागुणांनादेखील वाव दिला जातो. (प्रतिनिधी)

Web Title: Unique presentation of dancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.