मुस्लीम महिलांचे अनोखे रक्षाबंधन : एकात्मतेला बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 07:25 PM2017-08-07T19:25:31+5:302017-08-07T19:29:24+5:30
शहरात सोमवारी जुने नाशिकमधील मुस्लीम महिलांनी रक्षाबंधनानिमित्त एकत्र येऊन तोफखाना केंद्रातील जवान व शहर पोलीस अधिकाºयांच्या हातावर राख्या बांधल्या. यावेळी सर्वजाती धर्माच्या भिंती गळून पडल्या अन् राष्ट्रीय एकात्मतेला अधिकच बळ मिळाले.
नाशिक : भारत हा विविधतेने नटलेला व विविध जाती-धर्माच्या लोकांचा देश आहे. या देशात सर्व नागरिक एकमेकांच्या सण-उत्सवांमध्ये सहभागी होऊन गुण्यागोविंदाने सण साजरे करतात. याचा प्रत्यत शहरात सोमवारी (दि.७) आला. जुने नाशिकमधील मुस्लीम महिलांनी रक्षाबंधनानिमित्त एकत्र येऊन तोफखाना केंद्रातील जवान व शहर पोलीस अधिकाºयांच्या हातावर राख्या बांधल्या. यावेळी सर्वजाती धर्माच्या भिंती गळून पडल्या अन् राष्ट्रीय एकात्मतेला अधिकच बळ मिळाले.
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीचा सण म्हणून हिंदू संस्कृतीत ओळखला जातो. बहीण भावाला ओवाळून राखी बांधत आपले बंधूप्रेम व्यक्त करते. जवान, पोलीस हेदेखील समाजाचे व देशाचे रक्षण करतात. त्यामुळे जुने नाशिकमधील प्रभाग क्रमांक १४च्या नगरसेविका व माजी पूर्व प्रभाग सभापती समीना मेमन, सॅव्ही वुमेन महाविद्यालयाच्या संचालक श्रुती भुतडा यांच्या संक ल्पनेनुसार मुस्लीम-हिंदू महिलांनी एकत्र येत त्यांच्यासोबत रक्षाबंधन हा सण साजरा केला.
दरम्यान, सकाळी देवळालीच्या तोफखाना केंद्रात जाऊन या महिलांनी जवानांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत राख्या बांधल्या. यावेळी मुस्लीम महिलांनी पारंपरिक बुरखा व स्कार्फ परिधान केला होता. दुपारी महिलांनी पोलीस आयुक्तालयालाही भेट देऊन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपआयुक्त डॉ. लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत राखी बांधली. यावेळी रहनुमा उर्दू शाळेच्या मुख्याध्यापक शिरिन शेख, मोहसिना पठाण, शाहीन शेख, शकीला शेख, सलमा शेख, सीमा खान आदि महिलांसह ‘सॅव्ही’च्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.