अनोखे रक्षाबंधन: कर्तव्यावरील चालक भावाला लालपरी थांबवून बहिणीने बांधली राखी!
By राजकुमार जोंधळे | Published: August 11, 2022 11:32 PM2022-08-11T23:32:43+5:302022-08-11T23:33:11+5:30
Raksha Bandhan: बहिणीने कर्तव्यावर असलेल्या आपल्या भावाला चक्क रस्त्यावरच राखी बांधून औक्षण केले. या आगळ्या-वेगळया प्रसंगाने कोल्हापूर-नांदेड बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या डोळ्याच्या कडाही पाणावल्या.
- राजकुमार जोंधळे
लातूर - बहीण-भावाच्या अतूट प्रेमाचा सण म्हणजे राखी पौर्णिमा... दरवर्षी श्रावणातील राखी पौर्णिमेला आपल्या लाडक्या भावाची बहीण आतुरतेने वाट पाहते. अशाच बहिणीने कर्तव्यावर असलेल्या आपल्या भावाला चक्क रस्त्यावरच राखी बांधून औक्षण केले. या आगळ्या-वेगळया प्रसंगाने कोल्हापूर-नांदेड बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या डोळ्याच्या कडाही पाणावल्या.
कोल्हापूर आगारात कर्तव्यावर असलेले चालक लक्ष्मण मधूकर डावरे (वय 35) हे मूळचे चाकूर तालुक्यातील चपोली येथील रहिवासी आहेत. राखी पोर्णिमेनिमित्त पुण्याहून बहिण शामल नागनाथ शिंदे (रा. सुगाव ता. चाकूर) ही माहेरी चपोली येथे आलेली होती. कोल्हापूर येथे चालक असलेल्या भावाला तीने गावाकडे रक्षाबंधन सणासाठी येण्याची विनवणी केली.भावाचीही गावाकडे येण्याची तीव्र इच्छा होती मात्र, सुट्टी मिळाली नाही. याबाबत भावाने बहिणीला सांगितले, मला गावाकडे येणे जमणार नाही. यावर नाराज झालेल्या बहिणीने कळकळीने पुन्हा विनंती केली. या मार्गावरची दिवटी मिळणार नाही का? असे म्हटल्यानंतर चालक भावाने कोल्हापूर ते नांदेड मार्गावरील दिवटी देण्याबाबत विनंती केली. वरिष्ठांनी त्याला होकार दिला. कोल्हापूर स्थानकातून कोल्हापूर बस (एम.एच. १४ बी.टी. ४८७२) गुरुवारी पहाटे ५ वाजता नांदेडकडे मार्गस्थ झाली. दरम्यान, लातूरला बस आल्यानंतर भावावे बहिणीला फोन केला.
बहिण चपोली बस थांब्यावर हातात राखी, पेढा आणि ओवळण्यासाठी सजवलेलं ताट घेऊन आपल्या भावाची वाट पाहत जवळपास एक तास थांबली होती. चपोली येथे बस आल्यानंतर भावाला आणि सोबतचा सहकारी वाहक यांना खाली उतरण्यासाठी सांगितले. यावेळी रस्त्यावरच थंबूनच बहिणीने भावाला राखी बांधली आणि औक्षण केले. हा प्रसंग पाहून बसमधील प्रवासी गहिवरून गेले. जमलेल्या स्थानिक ग्रामस्थांचे डोळेही पाणावले होते. पहिल्यांदच अनोख्या रक्षाबंधनाचा क्षण अनेकांनी पहिला. हीच ती वेड्या बहिणीची वेडी माया उपस्थितांना अनुभवायला मिळाली.
आणि लालपरी नांदेडला गेली...
या आगळ्यावेगळ्या रखी पौर्णिमेनंतर कोल्हापूरची लालपरी प्रवाशांना घेऊन नांदेडच्या दिशेने रवाना झाली. केवळ पाच ते दहा मिनिटात घडलेल्या प्रसंगाने भावा-बहिणीच्या अतूट नात्याची साक्ष दिली. हे मात्र वास्तव..!