मनोरंजनासोबत ज्ञानाचा अनोखा खजिना!
By admin | Published: June 30, 2017 01:51 AM2017-06-30T01:51:24+5:302017-06-30T01:51:31+5:30
अभ्यासासोबतच मुलांचे मनोरंजन व्हावे आणि याच मनोरंजनातून हसतखेळत ज्ञानाचा खजिना त्यांच्यापुढे खुला व्हावा या हेतूने
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अभ्यासासोबतच मुलांचे मनोरंजन व्हावे आणि याच मनोरंजनातून हसतखेळत ज्ञानाचा खजिना त्यांच्यापुढे खुला व्हावा या हेतूने ‘लोकमत’मध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘संस्कारांचे मोती’ हे विशेष पान दररोज प्रसिद्ध होत आहे. २७ जूनपासून सुरू झालेल्या या उपक्रमाचे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले आहे. विद्यार्थ्यांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आता या उपक्रमांतर्गत स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
‘लोकमत’मध्ये रोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘संस्कारांचे मोती’ या विशेष पानात सामान्य ज्ञान, खेळ, जगातील स्मार्ट शहरांची माहिती, भाषा ज्ञान वाढवणारे कोडे, अभ्यासासाठी उपयुक्त आॅनलाइन साइट्सची माहिती असे बरेच काही आहे. ज्ञानाचा हा अनोखा खजिना आम्ही संग्रही ठेवत असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून मिळत आहेत. म्हणूनच विद्यार्थ्यांसाठी ‘संस्कारांचे मोती’अंतर्गत आता स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ही स्पर्धा इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असून स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे ती विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य आहे.
अशी होईल स्पर्धा-
१ जुलै ते १० आॅक्टोबर २०१७ असा स्पर्धेचा कालावधी आहे. या कालावधीत ‘लोकमत’मध्ये ‘संस्कारांचे मोती’ या पानावर रोज एक कुपन देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी हे कुपन कापून शाळांमधून वाटप करण्यात येणाऱ्या किंवा ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या प्रवेशिकेतील चौकटीत चिकटवायचे आहे.
९० पैकी कमीत कमी ८५ कुपन्स चिकटवहीत चिकटवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपली वही किंवा प्रवेशिका शाळेत ठेवलेल्या बॉक्समध्ये किंवा प्रवेशिका स्वीकृती केंद्रात १४ आॅक्टोबर २०१७ पर्यंत जमा करायची आहे. यातूनच विजेत्या स्पर्धकांची निवड करण्यात येईल.
हवाई सफरीची संधी-
प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला रिमोट कंट्रोल ट्रान्सफॉर्मर कार, दुसऱ्या विजेत्यास सॅक तर तृतीय क्रमांकाच्या विजयी स्पर्धकाला लंच बॉक्स देण्यात येईल. याशिवाय जिल्हानिहाय एका विद्यार्थ्यास हवाई सफरीची संधी मिळणार आहे. सोबतच उत्तेजनार्थ बक्षिसे व स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकाला विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. नोव्हेंबर २०१७ अखेर बक्षिसांचे वितरण करण्यात येईल.