हरित वसईसाठी एकजूट होईना

By Admin | Published: January 19, 2017 03:35 AM2017-01-19T03:35:30+5:302017-01-19T03:35:30+5:30

एमएमआरडीएच्या प्रस्तावित आराखड्याला वसईतून तीव्र विरोध होऊ लागला आहे.

Unite for the Green Vasai | हरित वसईसाठी एकजूट होईना

हरित वसईसाठी एकजूट होईना

googlenewsNext

शशी करपे,

वसई- एमएमआरडीएच्या प्रस्तावित आराखड्याला वसईतून तीव्र विरोध होऊ लागला आहे. आराखड्याला विरोध करण्यासाठी वसईतील चर्चमध्ये तेथील फादरांच्या पुढाकाराने गावकऱ्यांच्या सभा होऊ लागल्या आहेत. त्याचवेळी इतर संघटनांनीही आराखड्याला विरोध करून आपली वेगळी चूल मांडली आहे. त्यामुळे प्रखर विरोध असतांनाही वेगवेगळ्या चूली मांडल्या गेल्याने विरोधाची धार बोथट होण्याची भीती व्यक्त करण्यात येते.
वसई-विरार उपप्रदेशासाठी असलेला सिडकोचा नियोजन आराखडा २०२१ रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे एमएमआरडीएने नवीन विकास आराखडा जाहीर केला आहे. या आराखड्यात वसईचा हरितपट्टा नष्ट करण्याचा डाव रचण्यात आल्यामुळे वसईचे अस्तित्व टिकवण्यासाठी पर्यावरण संवर्धन समितीच्या माध्यमातून लढा उभारण्यात आला आहे. त्यासाठी निमंत्रक म्हणून समीर वर्तक यांची नेमणूक करण्यात आली असून, या आराखड्याची माहिती देवून हरकती नोंदवण्याबाबतचे मार्गदर्शन जेष्ठ नगररचनाकार चंद्रशेखर प्रभू यांच्यामार्फत गावागावात करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सिडको हटाव आंदोलनानंतर दोन दशकानंतर वसईतील चर्चमधून आराखड्याविरोधात जनजागृती केली जात आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो, चंद्रशेखर प्रभूंसह आराखड्याविरोधात लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सभा घेत आहेत. आतापर्यंत वसईतील बहुतेक चर्चमध्ये तेथील फादरांनी गावकऱ्यांना आराखड्याविरोधात हरकती नोंदवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे वसईच्या पश्चिम पट्ट्यात आराखड्याविरोधात उठाव होताना दिसत आहे. लोकशाहीमध्ये नेता नव्हे तर जनता सार्वभौम असते. सामान्य माणसाला अंधारात ठेऊन आराखडे तयार करणे ही लोकशाही विरोधी घटना आहे. एमएमआरडीचा नियोजित आराखडा मूठभर बिल्डरांच्या सल्लयाने व सोयीसाठी तयार झाला आहे. लोकांना विश्वासात घेतले गेले नाही. ही कृती घटनाविरोधी असल्याचा आरोप फादर दिब्रिटो यांनी केला आहे. लोकशिक्षण होऊ नये व जनतेने जागृत होऊ नये यासाठी हितसंंबंधी लोक प्रयत्नशिल असतात. ते दिशाभूल करून लोकांना गोंधळात टाकतात. ते व्यवस्थेचे दलाल असतात, असा आरोपही दिब्रिटो यांनी केला आहे. आराखडा वसई विरारला लागू नसेल तर कोट्यवधी रुपये खर्च करून शासनाने तो तयारच कशासाठी केला आहे? हा आराखडा सर्वांना कसा लागू आहे याची कबुली एमएमआरडीएने इंग्रजी वर्तमानपत्रात केलेल्या खुलाशात दिली असल्याचे दिब्रिटो यांनी सांगितले.
दरम्यान, आराखड्याला विरोध करण्यासाठी पर्यावरण संरक्षण समितीकडून ३० जानेवारीला वसई तहसिल कचेरीसमोर फादर दिब्रिटो यांच्या नेतृत्वाखाली मौन उपोषण करण्यात येणार आहे. बिशप्स हाऊसचा समितीला पाठिंंबा असल्याने त्याला मोठा पाठिंंबा मिळेल असे जाणवते आहे. (प्रतिनिधी)
>उद्देश एक आंदोलने मात्र होत आहेत तीन
दुसरीकडे जनआंदोलन समितीने स्थापन केलेल्या वसई बचाव कृती समितीने येत्या २६ जानेवारीला एसटी बचावची मागणी करून चिमाजी आप्पा मैदानामधून मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी २९ गावांना महापालिकेतून मुक्त करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सकारात्मक निर्णय घेणे व एमएमआरडीएमध्ये समाविष्ट गावांना आराखडयातून मुक्त करावे अशी मागणीही करण्यात येणार आहे.
तिसरीकडे, मनवेल तुस्कानो यांनी जनता दल (से.)मार्फतही गावागावातून हरकती नोंदवून घेण्याचे काम सुरु आहे. त्याचबरोबर तुस्कानो यांच्या निर्भय जन संस्थेच्या माध्यमातून आराखड्याला विरोध करण्यासाठी गावागावात जनजागृती केली जात आहे.
मात्र एकाच हेतूसाठी तीन संघटना वेगवेगळ्या मार्गाने लढा देत असल्याने हिरव्या वसईसाठी वसईकरांमध्येच एकजूट नसल्याचे चित्र समोर येत आहे.

Web Title: Unite for the Green Vasai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.