अवयवदानासाठी राज्यस्तरावर एकजूट
By admin | Published: September 26, 2016 03:13 AM2016-09-26T03:13:37+5:302016-09-26T03:13:37+5:30
राज्यात अवयवदानाची जनजागृती होत असली, तरीही सर्व गरजू रुग्णांना अवयव मिळतील इतका अवयवदानाचा टक्का वाढलेला नाही.
मुंबई : राज्यात अवयवदानाची जनजागृती होत असली, तरीही सर्व गरजू रुग्णांना अवयव मिळतील इतका अवयवदानाचा टक्का वाढलेला नाही. अवयवदानासाठी जिल्हा, शहर पातळीवर अनेक व्यक्ती, संस्था वैयक्तिक पातळीवर करत असल्याने अनेकदा अडचणी येतात. या अडचणी दूर करून आता राज्य पातळीवर स्थापन करण्यात आलेल्या फेडरेशनच्या माध्यमातून राज्यातील अवयवदानासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था एकत्र आल्या आहेत. या एकत्रित प्रयत्नांतून राज्य अवयवदान चळवळीत अव्वल क्रमांकावर नेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
मुंबईत कार्यरत असलेल्या ‘द फेडरेशन आॅफ आॅर्गन अँड बॉडी डोनेशन’तर्फे रविवारी महाराष्ट्र सेवा संघात एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला फेडरेशनचे पुरुषोत्तम पवार यांनी ही परिषद आयोजित करण्याच्या मागील भूमिका सांगितली.
अवयवदानामध्ये राज्याला देशात प्रथम क्रमांकावर नेण्याचा निर्धार अवयवदान चळवळीतील कार्यकर्त्यांनी या परिषदेत व्यक्त केला. सध्या देशात अवयवदानात तामिळनाडूचा प्रथम क्रमांक लागतो, तर दुसरीकडे श्रीलंका नेत्रदानात सर्वात पुढे आहे. श्रीलंकेतून डोळे निर्यात केले जातात. राज्य पातळीवर नेत्रदान चळवळ पुढे नेण्यासाठीही विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे फेडरेशनचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांनी सांगितले. अवयवदान अथवा देहदान करताना येणाऱ्या अडचणींचे कथन कार्यकर्त्यांनी केले. त्यावर उत्तर देताना डॉ. प्रवीण शिनगारे यांनी अवयवदान, देहदानातील नियमांत झालेले बदल सांगितले. डॉ. अन्वय मुळे यांनी हृदयदानाविषयी जनजागृती वाढली असून, ग्रीन कॉरिडोरसाठी पोलिसांची मदत कशी होते, हे विशद केले.
नेत्रदान आणि त्वचादानात समन्वय करण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. सुनील केसवानी म्हणाले. राज्याला अवयवदानात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी ग्रामीण भागात जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे मत, मोहन फाउंडेशनचे डॉ. रवी वानखडे यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)
या परिषदेत राज्यासह सुरत, अहमदाबाद आणि जोधपूर येथूनही तज्ज्ञ सहभागी झाले होते. या परिषदेला वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, नाशिकच्या हृषिकेश रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. भाऊसाहेब मोरे, युरॉलॉजिस्ट डॉ. वत्सला त्रिवेदी, हृदयप्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. अन्वय मुळे, नॅशनल बर्न सेंटरचे प्रमुख डॉ. सुनील केसवानी, जे. जे. रुग्णालयाच्या शरीरशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. दीपक जोशी, मोहन फाउंडेशनचे समन्वयक डॉ. रवी वानखडे उपस्थित होते. या वेळी फेडरेशनचे सुधीर बागाईतकर, हरखचंद सावला, विनोद हरीया, मीरा सुरेश, महाराष्ट्र सेवा संघाचे चंद्रशेखर वझे यांचाही या परिषदेत सहभाग होता.