नावावर एकमत होईना : थोरल्या पवारांवर काहींची भिस्त
By admin | Published: April 29, 2016 12:57 AM2016-04-29T00:57:19+5:302016-04-29T00:57:19+5:30
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी शहराध्यक्षपद निवडीसाठी बैठक आयोजित
पुणे : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी शहराध्यक्षपद निवडीसाठी बैठक आयोजित केली; पण आता कोणत्याही एका नावावर एकमत होत नसल्याने त्यांचीही पंचाईत झाली आहे. इच्छुकांपैकी काहींची भिस्त थोरल्या पवारांवर असून, त्यांच्या मार्फत काही होईल का, याची चाचपणी सुरू आहे; मात्र त्याचवेळी अजित पवारांकडे या गोष्टी जाऊ नयेत, याचीही काळजी घेतली जात आहे.
महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष, काँग्रेस या बड्या पक्षांनी शहराध्यक्षपदावर नव्याने नियुक्ती केली. महापालिकेच्या सत्तेतील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र त्याकडे दुर्लक्षच केले जात होते. विद्यमान अध्यक्ष, खासदार वंदना चव्हाण यांची मुदत संपून बराच कालावधी लोटला आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतरही त्यासंबंधी काही निर्णय न घेता त्यांनाच काम पाहण्यास सांगण्यात
आले.
प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची निवड झाल्यानंतर, तरी बदल होईल, अशी अनेकांची अटकळ होती. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे काही इच्छुकांनी अजित पवार यांची भेट घेऊन पक्ष संघटनेसाठी बदल कसा आवश्यक आहे, ते सांगितले. त्यामुळेच फक्त या एका विषयासाठी पवार व तटकरे यांनी २ मे रोजी बैठक आयोजित केली असून, त्याची जोरदार चर्चा सध्या राष्ट्रवादीमध्ये आहे.
आमदार, विधानसभा निवडणूक लढवून त्यात पराभूत झालेले विद्यमान नगरसेवक, काही बडे माजी नगरसेवक यांचा इच्छुकांमध्ये समावेश आहे. भाजपा तसेच काँग्रेस या दोन्ही पक्षांची महापालिकेच्या राजकारणात मुरलेल्यांना शहराध्यक्षपद दिले आहे. तोच निकष राष्ट्रवादीनेही लावावा, असे सांगत काहीजण त्यासाठी आपणच योग्य असल्याचा दावा करीत आहेत. काही इच्छुक पक्षाची एका विशिष्ट जातीचा पक्ष, अशी प्रतिमा खोडण्यासाठी आपल्यालाच ते पद द्यावे, अशी मागणी करीत आहेत, तर काहींनी अल्पसंख्याकाना आता तरी संधी देणार की नाही, असा धोषा लावला आहे.
काही ज्येष्ठांनी पक्षात अनेक वर्षे सक्रिय असतानाही बाजूला ठेवले असल्याचे शरद पवार यांना सांगत राजकीय वर्तुळातील संपर्क लक्षात घेऊन हे पद देण्याची मागणी केली आहे, असे समजते. (प्रतिनिधी)
>४सर्व सहमतीने अध्यक्षाची निवड व्हावी, या हेतूने पवार यांनी पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधींना बैठकीसाठी बोलाविले आहे. मात्र, इच्छुकांमध्ये एकमत होत नसल्याची माहिती मिळाली. आपणच कसे या पदासाठी योग्य आहोत, हे परस्परांना सांगण्यातच सर्व इच्छुक दंग आहेत.
४पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या अलीकडच्याच पुणे दौऱ्यात विद्यमान अध्यक्ष वंदना चव्हाण यांच्याशी या विषयावर प्रदीर्घ चर्चा केली असल्याचे समजते. त्यामुळे या पदावर त्यांचीच फेरनिवड होण्याची किंवा त्यांच्या पसंतीने अध्यक्ष निवडला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.ं