विद्यापीठांनी नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी - चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 07:49 PM2023-10-10T19:49:51+5:302023-10-10T19:50:07+5:30

चंद्रकांत पाटील म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीला अधिक गती अपेक्षित आहे.

Universities should effectively implement the new education policy - Chandrakant Patil | विद्यापीठांनी नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी - चंद्रकांत पाटील

विद्यापीठांनी नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी - चंद्रकांत पाटील

मुंबई : नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी तातडीने शैक्षणिक उपाययोजना करून विद्यापीठांनी शैक्षणिक वेळापत्रक व गुणांकन कार्यपध्दतीचे अचूक नियोजन करावे आणि नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आदेश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, विलेपार्ले, मुंबई येथे नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी संदर्भात गठीत केलेल्या सुकाणू समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. 

या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, उद्योजक भरत अमलकर, प्राचार्य अनिल राव माजी कुलगुरू डॉ.  मुरलीधर चांदेकर, जोगिंदर सिंग दिसेन, युगांक गोयल संबंधित अधिकारी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीला अधिक गती अपेक्षित आहे. यासाठी गठीत केलेल्या  समितीने वारंवार बैठका घेऊन विचार मंथन करावे आणि अंमलबजावणीसाठी  काय अडचणी आहेत याबाबत सूचना कराव्यात. तसेच प्रत्येक जिल्ह्यात नवीन शैक्षणिक धोरणसंदर्भात वारंवार बैठका घेऊन नवीन शैक्षणिक धोरणसंदर्भात जनजागृती करावी. 

महाविद्यालये व  विद्यापीठांच्या क्लस्टर निर्मितीला  प्रोत्साहन देण्यात राज्य पुढे आहे ही चांगली बाब आहे. पण नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी मध्ये सुद्धा महाराष्ट्र अग्रेसर असला पाहिजे. विद्यापींंठाचे अनेक विषय केंद्र सरकारशी संबंधित असतात याबाबत केंद्र सरकारशी पाठपुरावा करावा.  यासाठी दर महिन्याला आपला प्रतिनिधी दिल्लीला पाठवावा आणि  नवीन शैक्षणिक धोरणा अंमलबजावणी बाबत ज्या नवीन मार्गदर्शक सूचना असतील त्याची अंमलबजावणी करावी अशा सूचनाही चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

तसेच, या नवीन धोरणाची अंमलबजावणी करत असताना  प्राध्यापकांच्या मनात जी भीती निर्माण झाली आहे.  याबाबत राज्यभर कार्यशाळा घेऊन  त्यांच्या मनातली भीती दूर करावी आणि नवीन शैक्षणिक धोरण समजून सांगावे. ज्या विद्यापीठामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार नाही अशा विद्यापींठावर कारवाई करण्यात येईल, असे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Universities should effectively implement the new education policy - Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.