विद्यापीठ उत्तरपत्रिका घोटाळा: ‘टॉपर’चीही चौकशी होणार

By admin | Published: May 23, 2016 04:24 AM2016-05-23T04:24:53+5:302016-05-23T05:34:41+5:30

मुंबई विद्यापीठातील अभियांत्रिकी शाखेचे उत्तरपत्रिका घोटाळा प्रकरण ‘टॉपर’ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहे. अव्वल स्थान पटकाविलेल्या काही विद्यार्थ्यांनाही उत्तरपत्रिका घरी पुरविण्यात आल्या होत्या

University Ayurvedic scam: Topper will also be questioned | विद्यापीठ उत्तरपत्रिका घोटाळा: ‘टॉपर’चीही चौकशी होणार

विद्यापीठ उत्तरपत्रिका घोटाळा: ‘टॉपर’चीही चौकशी होणार

Next

समीर कर्णुक,  मुंबई
मुंबई विद्यापीठातील अभियांत्रिकी शाखेचे उत्तरपत्रिका घोटाळा प्रकरण ‘टॉपर’ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहे. अव्वल स्थान पटकाविलेल्या काही विद्यार्थ्यांनाही उत्तरपत्रिका घरी पुरविण्यात आल्या होत्या, अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे त्यांचाही शोध घेतला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आता ‘टॉपर’ विद्यार्थ्यांची यादी बनविली जाणार असून, त्याची सविस्तर माहिती मिळविण्यासाठी स्वतंत्र पथक बनविण्यात येणार असल्याचेही तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना लिहिलेल्या उत्तरपत्रिका पुन्हा पूर्ण सोडविण्यासाठी घरी देण्याचे विद्यापीठातील रॅकेट शनिवारी मुलुंड पोलिसांनी उघडकीस आणले. या प्रकरणातील अटक केलेल्या सात कर्मचाऱ्यांकडे स्वतंत्रपणे सविस्तर चौकशी सुरू आहे. तसेच गेल्या ४, ५ वर्षांमध्ये अव्वल स्थान पटकाविणाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे.
आज होणार कारवाई!
अभियांत्रिकी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांबद्दल घडलेल्या अनुचित प्रकाराबद्दल मुंबई विद्यापीठाने तत्काळ कठोर पावले उचलली आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधन समितीने या प्रकरणाची सखोल चौकशी करून परीक्षा मंडळाकडे चौकशी समितीचा अहवाल सुपुर्द केला आहे. त्यामुळे संबंधितांवर उद्या कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या प्रकरणी मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम.ए. खान, परीक्षा नियंत्रक दीपक वसावे आणि पोलिसांशी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी चर्चा करत काल (शनिवारी) सत्यशोधन समितीची स्थापना केली होती. या समितीची आज दुपारी १२.३० वाजता बैठक झाली. या समितीमध्ये डॉ. सिद्धेश्वर गडदे, डॉ. सुरेश उकरंडे, प्रा. विनायक दळवी आणि प्रा. डॉ. विलास शिंदे यांचा समावेश होता. या समितीच्या अहवालावर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी आजच तातडीने परीक्षा मंडळाची बैठक बोलाविण्यात आली. त्यात सत्यशोधन समितीने सादर केलेल्या अहवालावर सविस्तर चर्चा करून परीक्षा मंडळाने काही महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या आहेत. या शिफारशींवर उद्या, २३ मे रोजी व्यवस्थापन परिषदेमध्ये सविस्तर चर्चा केली जाईल. या प्रकरणी दोषी असलेल्यांवर योग्य ती कारवाईही उद्याच केली जाणार असून, काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येतील, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून मुंबई विद्यापीठाकडून खंबीर पावले उचलण्यात येणार असल्याचे विद्यापीठाचे जनसंपर्क विभागाचे उपकुलसचिव लीलाधर बन्सोड यांनी सांगितले. ते म्हणाले की, त्यासाठी प्रशासनिक सुधारणांसहित आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर अवलंब केला जाईल. यामध्ये परीक्षा भवन तसेच अन्य महत्त्वाच्या जागी सीसीटीव्ही कॅमेरे, त्यांवर नियंत्रण करण्यासाठी नियंत्रण कक्ष, परीक्षा विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अ‍ॅक्सेस कंट्रोल आणि घुसखोरी तपासणी सॉफ्टवेअरमार्फत देखरेख अशा विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत.
जबाबदारी विद्यापीठाचीच - विनोद तावडे
देशातील प्रमुख विद्यापीठांमध्ये गणना होणाऱ्या मुंबई विद्यापीठातील उत्तरपत्रिकांचा घोटाळा उघडकीस आल्याने राज्याची मोठी नाचक्की झाली आहे. या धक्कादायक प्रकाराबाबत बोलताना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी या उत्तरपत्रिका घोटाळ्यास सर्वस्वी विद्यापीठ प्रशासन जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
मुंबई विद्यापीठ स्वायत्त संस्था आहे. त्याच्या दैनंदिन कारभारात राज्य सरकार अजिबात लुडबुड करीत नाही. त्यामुळे या उत्तरपत्रिका घोटाळ्याची सारी जबाबदारी विद्यापीठ प्रशासनाची आहे. मात्र, विद्यापीठ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे वारंवार असे प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे.
आगामी काळात प्रशासनाच्या कारभारात सुधारणा झाली नाही आणि हा भोंगळ कारभार कायम राहिल्यास सरकारला कठोर पावले उचलावी लागतील. मुंबई विद्यापीठाची स्वायत्तता काढून घ्यावी का, याबाबतही सरकार गांभीर्याने विचार करेल, असे विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाबाबत भांडुपच्या उपायुक्तांशी चर्चा झाली असून, लवकरच सविस्तर अहवाल अपेक्षित आहे. विद्यापीठाची प्रतिष्ठा राखली जाणे महत्त्वाची बाब आहे. विद्यापीठाची प्रतिमा चांगलीच राहील याची राज्य सरकार दक्षता घेत असल्याचे तावडे म्हणाले. कुलगुरू संजय देशमुख प्रशासनावर पकड निर्माण करण्यात अद्याप अपयशी ठरल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात आहे. आगामी काळात त्यांनी आपले दौरे कमी केले नाहीत तर असेच प्रकार वारंवार घडतील अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: University Ayurvedic scam: Topper will also be questioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.