दिल्ली विद्यापीठाचा ‘माओवादी’ प्राध्यापक जेरबंद
By Admin | Published: May 10, 2014 01:34 AM2014-05-10T01:34:11+5:302014-05-10T01:34:11+5:30
नक्षल चळवळीसाठी समन्वयक म्हणून काम करणारा दिल्ली विद्यापीठाचा प्रा. जी.एल. साईबाबा याला शुक्रवारी गडचिरोली पोलिसांनी दिल्लीत अटक केली.
गडचिरोली पोलिसांची कारवाई : आंतरराष्टÑीय विभागाचा अध्यक्ष
अभिनय घोरपडे
गडचिरोली जहाल नक्षलवाद्यांच्या देशभरातील कामात सक्रिय असलेला आंतरराष्टÑीय विभागाचा अध्यक्ष तसेच देशपातळीवर नक्षल चळवळीसाठी समन्वयक म्हणून काम करणारा दिल्ली विद्यापीठाचा प्रा. जी.एल. साईबाबा याला शुक्रवारी गडचिरोली पोलिसांनी दिल्लीत अटक केली. त्याच्यावर बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल असून शनिवारी (दि. १०) अहेरी न्यायालयात त्याला हजर केले जाणार आहे. साईबाबा हा इंग्रजीचा प्राध्यापक असल्याने त्याला नक्षल चळवळीत देशभर समन्वय ठेवणे सोपे जात होते. देशभरात सक्रिय असलेल्या बुद्धिवंताचा पाठिंबा या चळवळीला मिळवून देण्याचेही काम तो करीत असल्याचे जप्त केलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. या आधारे अहेरी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या तिघांवर बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधात्मक कायद्यान्वये कारवाई करण्यास राज्याच्या गृहमंत्रालयाने मान्यता दिल्यानंतर लगेच शुक्रवारी पोलिसांनी दिल्लीत जाऊन कारवाई केली. विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, गडचिरोली पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशीकुमार मिना व तपास अधिकारी सुहास बावचे यांच्या पथकाने दिल्लीत कारवाई केली. आॅक्टोबर महिन्यात दिल्लीत साईबाबाच्या घराची झडती घेण्यात आली होती. चौकशीत साईबाबा नक्षल चळवळीत सक्रिय असल्याचे पोलिसांना आढळून आले होते. साईबाबा नक्षलवाद्यांच्या आंतरराष्टÑीय विभागाचा अध्यक्ष म्हणून काम बघत होता. त्यासाठी त्याने अनेकदा परदेशवार्याही केल्या होत्या.