विद्यापीठाचे परीक्षा वेळापत्रक बिघडले
By admin | Published: November 5, 2014 04:29 AM2014-11-05T04:29:19+5:302014-11-05T04:29:19+5:30
मुंबई विद्यापीठाच्या बीएमएस हॉलतिकिटाचा गोंधळ संपतो ना संपतो तोच मंगळवारी यामध्ये आणखी एका वादाची भर पडली आहे
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या बीएमएस हॉलतिकिटाचा गोंधळ संपतो ना संपतो तोच मंगळवारी यामध्ये आणखी एका वादाची भर पडली आहे. टीवायबीएसस्सीची १८ नोव्हेंबर रोजी होणारी पाचव्या आणि सहाव्या सेमिस्टरची परीक्षा एकाच दिवशी आणि एकाच वेळेत आल्याने विद्यापीठाचा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण आहे.
विधानसभा निवडणुकांमुळे पुढे ढकललेल्या विद्यापीठाच्या आॅक्टोबर परीक्षा सध्या सुरू आहेत. टीवायबीएस्सीच्या पाचव्या आणि सहाव्या सेमिस्टरची परीक्षा नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होत आहेत. १८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते ५.३० या वेळात दोन्ही सेमिस्टरचे आॅरगॉनिक केमिस्ट्री आणि अपलाइड कंपोनंट हे पेपर आहेत. एकाच दिवशी पाचव्या आणि सहाव्या सेमिस्टरची परीक्षा घेण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. सहाव्या सेमिस्टरची परीक्षा देणारे विद्यार्थी त्याच दिवशी आणि वेळेत सेमिस्टर पाचच्या एटीकेटीचा पेपर देणार आहेत. त्यामुळे कोणत्या परीक्षेला उपस्थित राहावे, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.
ऐन परीक्षेच्या कालावधीत विद्यापीठाच्या हॉल तिकिटाचा गोंधळ व वेळापत्रकातील चुकांमुळे विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे विद्यापीठाने वारंवार होणाऱ्या गोंधळास जबाबदार असणाऱ्या एमकेसीएल या कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी सिनेट सदस्य संजय वैराळ यांनी केली
आहे. (प्रतिनिधी)