विद्यापीठाने खेळ मांडला परीक्षेचा

By admin | Published: May 14, 2015 01:18 AM2015-05-14T01:18:11+5:302015-05-14T01:19:44+5:30

परीक्षांची स्थिती : दरवेळी नवीन चूक; विद्यार्थी कमालीचे वैतागले

The university examined the game | विद्यापीठाने खेळ मांडला परीक्षेचा

विद्यापीठाने खेळ मांडला परीक्षेचा

Next

संतोष मिठारी= कोल्हापूर -कधी हाताने लिहिलेली प्रश्नपत्रिका, कधी प्रश्नपत्रिकेच्या दुसऱ्या भागाची छपाई नाही, तर परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर पेपर होणार नसल्याचे विद्यार्थ्यांना सांगणे, असे प्रकार शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये घडत आहेत. परीक्षांबाबत दरवेळी एक नवीन चूक होत आहे. त्यामुळे विद्यार्थी वैतागले असून, एकूणच परीक्षांची सद्य:स्थिती पाहता ‘कालचा गोंधळ बरा होता’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
विद्यापीठाच्या द्वितीय सत्रातील परीक्षा सध्या सुरू आहेत. यात नियमित विद्यार्थ्यांसह दूरशिक्षण विभागाच्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. पहिल्या सत्राचा निकाल मिळविणे आणि दुसऱ्या सत्रासाठी अर्ज भरण्याची प्रक्रियादेखील गोंधळातच पार पडली.
त्यानंतर काही दिवसांत परीक्षा सुरू झाल्या; पण काही अभ्यासक्रमांच्या परीक्षांबाबतचा गोंधळ सुरू झाला.
एप्रिलमध्ये बी. एड्.च्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना मानसशास्त्र विषयाची हाताने लिहिलेली प्रश्नपत्रिका सोडवावी लागली. माध्यमशिक्षण विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दुसऱ्या भागाची छपाई न करून विद्यापीठाने कहर केला. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपूर्वी दूरशिक्षण विभागातील एम. ए. समाजशास्त्र विषयाच्या विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर त्यांना प्रश्नपत्रिका नसल्याने पेपर होणार नसल्याचे सांगून विद्यापीठाने अनागोंदी कारभाराचे टोक गाठले.
पत्रकारितेच्या पदविका परीक्षेत मूळ विषयाऐवजी दुसऱ्याच विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हातात पडली. दरवेळी नवीन चूक होत असून त्याला परीक्षा अथवा दूरशिक्षण विभाग जबाबदार असल्याचे दिसून येत आहे.
वर्षभर अभ्यास करायचा आणि नेमक्या परीक्षेच्या वेळी विद्यापीठाच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडत आहे. यात दोष नसतानाही विद्यार्थी भरडले जात आहेत. गुणवत्तेचा केंद्रबिंदू पुण्याकडून कोल्हापूरकडे सरकविणाऱ्या विद्यापीठाच्या नावलौकिकाला परीक्षेबाबतचे असे प्रकार बाधा पोहोचविणारे आहे.


परीक्षेत गोंधळाचे प्रकार घडू नयेत, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना परीक्षा विभाग आणि दूरशिक्षण विभागाला दिल्या आहेत. अडचणी समजून घेणे आणि त्या सोडविण्याच्या दृष्टीने बैठक घेण्याचे नियोजन आहे.
- डॉ. अशोक भोईटे,
प्रभारी कुलगुरू
परीक्षा आणि दूरशिक्षण विभागात समन्वय नसल्याने गोंधळाचे प्रकार घडत असल्याचे दिसत आहे. परीक्षांतील गोंधळाचे प्रकार वाढतच आहेत. ते थांबविण्यासाठी विद्यापीठाने यंत्रणा कार्यान्वित करावी. विद्यार्थ्यांच्या परीक्षाविषयक अडचणींबाबत येत्या आठवड्यात कुलगुरूंना भेटणार आहे.
- अवधूत अपराध, शहराध्यक्ष,
राष्ट्रवादी विद्यार्थी सेना

समन्वय, सहकार्याचा अभाव
अनेक अभ्यासक्रमांच्या नियमित आणि दूरशिक्षण विभागाची विद्यार्थ्यांची परीक्षा एकत्रितपणे होते. त्यांना विनात्रास परीक्षा देता यावी, ही जबाबदारी परीक्षा विभागासह दूरशिक्षण विभागाची आहे. मात्र, प्रत्यक्षात या दोन्ही विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे चित्र आहे. शिवाय काही कर्मचारी यंत्रणेतील काही घटकांना सहकार्य करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परीक्षांबाबतचा गोंधळ वारंवार उडत आहे. विद्यापीठाचा केंद्रबिंदू असलेल्या विद्यार्थ्यांबाबत संबंधित विभाग गंभीर नाही. गेल्या महिन्याभरातील गोंधळाचे प्रकार पाहिल्यानंतर ते स्पष्ट होत असल्याच्या प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

Web Title: The university examined the game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.