मुंबई विद्यापीठ निकाल : कंत्राटी प्राध्यापकांमुळे मूल्यांकन रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 04:59 AM2017-08-11T04:59:04+5:302017-08-11T04:59:08+5:30
सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांमध्ये बहुतांश प्राध्यापक हे कायमस्वरूपी नसल्याने त्याचा फटका मूल्यांकनाला बसत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे इतर विद्यापीठांतील प्राध्यापकांच्या मदतीवरच विद्यापीठाच्या निकालाची मदार असल्याचे समजते.
मुंबई : मुंबई विद्यापीठात सध्या ८ लाख वाणिज्यच्या (बी. कॉम) उत्तरपत्रिकांचा समावेश असून त्यात २ लाख उत्तरपत्रिका या सेल्फ फायनान्सच्या अभ्यासक्रमांच्या आहेत. सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांमध्ये बहुतांश प्राध्यापक हे कायमस्वरूपी नसल्याने त्याचा फटका मूल्यांकनाला बसत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे इतर विद्यापीठांतील प्राध्यापकांच्या मदतीवरच विद्यापीठाच्या निकालाची मदार असल्याचे समजते.
दरम्यान, आयडॉलच्या २ लाख विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका आणि पारंपरिक अभ्यासक्रमांमधील १ लाख उत्तरपत्रिका या अनुदानित महाविद्यालयांच्या आहेत. तर उरलेल्या सर्व उत्तरपत्रिका या विनाअनुदानित महाविद्यालयांतील आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अनुदानित महाविद्यालयातील शिक्षकांचा उत्तरपत्रिका तपासणीचा कोटा पूर्ण झालेला आहे. त्यामुळे उरलेल्या उत्तरपत्रिका कोण तपासणार, हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे.
अनुदानित महाविद्यालयांमधील प्राध्यापकांकडून विनाअनुदानित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासून घेण्याचा पर्याय विद्यापीठासमोर उपलब्ध असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वेळेत निकाल लावण्यासाठी याआधीच विद्यापीठ प्रशासनाने राज्यातील इतर विद्यापीठांकडे मदतीसाठी धाव घेतली आहे. इतर विद्यापीठातील प्राध्यापकांनी तपासलेल्या उत्तरपत्रिकांचा दर्जाही प्रशासनाने तपासला आहे. त्यात मुंबई आणि बाहेरील प्राध्यापकांच्या तापसणीमध्ये फारशी तफावत नसल्याची माहिती विशेष अधिकारी विनायक दळवी यांनी दिली. उरलेल्या उत्तरपत्रिकाही इतर विद्यापीठांतील प्राध्यापकांकडून तपासून घेण्याचे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
२१७ निकाल बाकी
मुंबई विद्यापीठातील एकूण ३०७ निकाल गुरुवारी रात्रीपर्यंत जाहीर झाले आहेत. तर अद्याप २१७ निकाल निकाल बाकी आहेत. गुरुवारी १ हजार ३८ प्राध्यापकांनी १९ हजार ७५८ उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण केले.
रखडलेले निकाल वेळेवर लावण्याचे प्रमुख आव्हान आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाºयांसोबत चर्चा सुरू असून लवकरच निकाल जाहीर केले जातील. हेल्प डेस्कचा आढावा घेऊन त्यातील त्रुटीही दूर केल्या जातील.
- डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू