विद्यापीठाला ‘प्रपोपीस आफ्रिकाना’चे पेटंट
By admin | Published: August 8, 2015 12:45 AM2015-08-08T00:45:13+5:302015-08-08T00:45:37+5:30
संशोधकांची कामगिरी : नायजेरिया विद्यापीठासमवेतच्या करारातून साध्य
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ आणि नायजेरिया विद्यापीठाच्या संयुक्त संशोधनामधून पेटंटची निर्मिती झाली आहे. आफ्रिकेमध्ये वाढणाऱ्या ‘प्रपोपीस आफ्रिकाना’ (ढ१ङ्मस्रङ्मस्र्र२ आ१्रूंल्लं) या झाडाच्या सालीमधून निघणाऱ्या रसायनाच्या औषधी वापराबाबतचे हे पेटंट आहे. शिवाजी विद्यापीठ व नायजेरिया विद्यापीठ यांच्यात सन २०१२ मध्ये संशोधनविषयक सामंजस्य करार झाला आहे. नायजेरिया विद्यापीठातील महिला संशोधक डॉ. पेत्रा ओ. एन. यांना भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून (डी.एस.टी.) ‘डॉ. सी. व्ही. रामन फेलोशिप फॉर आफ्रिकन कंट्रीज’ ही शिष्यवृत्ती मिळाली. त्याअंतर्गत डॉ. पेत्रा शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागात प्रा. लोखंडे यांच्या प्रयोगशाळेत चार महिन्यांच्या संशोधनासाठी रुजू झाल्या. या कालावधीत त्यांनी नायजेरियातील ‘प्रपोपीस आफ्रिकाना’ या झाडाच्या सालीवर संशोधन सुरू केले. त्याच्या सालीमधील डिंकासारख्या चिकट स्रावात अनेक प्रकारचे सेंद्रिय पॉलीमर पदार्थ सापडतात. त्यांतील काही पॉलीमर अलग करून त्यांचा वापर औषधी गोळ्यांमध्ये करता येतो. या पॉलीमरमुळे औषधी गोळ्या तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पावडरची विद्राव्यता वाढते. त्यामुळे रुग्णाला लागणाऱ्या औषधाची मात्रा कमी करता येते. तसेच हे पॉलीमर शरीराला अपायकारक नसून स्वस्तात उपलब्ध होते.
नायजेरिया विद्यापीठाच्या डॉ. पेत्रा ओ. एन. यांनी तेथून फाइल केलेल्या पेटंटवर शिवाजी विद्यापीठातील पदार्थविज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांच्यासह के. आय. टी. कॉलेजच्या डॉ. मोनिका सानंदम, भारती विद्यापीठाच्या फार्मसी कॉलेजचे डॉ. अनिलकुमार शिंदे, डॉ. नामदेव जाधव यांची सहसंशोधक म्हणून नावे आहेत. या सर्वांच्या चार महिन्यांच्या अथक संयुक्त परिश्रमांतून पेटंटयोग्य संशोधन साकारले आहे. भारतीय कायद्यानुसार हे पेटंट भारतातून फाइल करणे शक्य नसल्याने डॉ. पेत्रा यांनी ‘डीएसटी’च्या संमतीने या सर्वांच्या नावे ते पेटंट नायजेरियातून फाइल केले.
‘प्रपोपीस आफ्रिकाना’चा उपयोग
‘प्रपोपीस आफ्रिकाना’ ही वनस्पती मुख्यत: आफ्रिका, अमेरिका व आशिया खंडांत सापडत असल्याची माहिती डॉ. सी. डी. लोखंडे यांनी दिली. ते म्हणाले, या झाडाचे अनेक उपयोग आहेत. त्याच्या बुंध्यापासून लाकडी सामान (फर्निचर) व बोटी तयार करतात. स्वयंपाकामध्ये त्याच्या बियांचा वापर केला जातो. त्याची पाने जनावरांना चारा म्हणून देतात. त्याच्या सालीमध्ये अनेक प्रकारचे उपयुक्त व गुणकारी पॉलीमर्स सापडतात.