पण... अज्ञात कवीसुद्धा
By admin | Published: August 21, 2016 02:16 AM2016-08-21T02:16:51+5:302016-08-21T02:16:51+5:30
स्वातंत्र्य दिन ही गोष्ट वर्षातून एकदाच साजरा करण्याची गोष्ट आहे का? स्वातंत्र्य ही गोष्ट इतकी बहुमोल आहे की, त्याचे महत्त्व आणि त्यासाठी ज्यांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला, त्यांचे
- रविप्रकाश कुलकर्णी
स्वातंत्र्य दिन ही गोष्ट वर्षातून एकदाच साजरा करण्याची गोष्ट आहे का? स्वातंत्र्य ही गोष्ट इतकी बहुमोल आहे की, त्याचे महत्त्व आणि त्यासाठी ज्यांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला, त्यांचे स्मरण म्हणून १५ आॅगस्टचे स्मरण ही एक प्रतिनिधिक गोष्ट आहे. वास्तविक, ही गोष्ट सदैव स्मरणात राहायला पाहिजे. मी हे सगळे १५आॅगस्ट सोहळा होऊन गेल्यानंतरही का सांगतो आहे, याचे कारणही तसेच आहे.
शक्यतो, १५ आॅगस्ट रोजी झेंडावंदनासाठी मी सार्वजनिक ठिकाणी जातो. शक्य असेल तर शाळेतच जातो. यंदाही तसाच गेलो. त्या निमित्ताने काही गोष्टी शेअर कराव्याशा वाटत आहेत.
आधी ‘जण गण मण’ संबंधात पाहू या
रवींद्रनाथ टागोर यांनी जेव्हा ‘जण गण मन’ लिहिले, तेव्हा हिंदुस्थान अखंड एक होता, म्हणून त्यांनी ‘पंजाब, सिंध, गुजरात, मराठा’ असे लिहिले हे खरेच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. या देशाचे दोन तुकडे झाले. हिंदुस्थान-पाकिस्तान हे दोन देश स्वतंत्र्य अस्तित्वात आले. हिंदुस्थान म्हटल्यावर कुणाला जातीय वास येत असेल, तर ‘भारत’ म्हणू या त्याला हरकत असायचे कारण नाही. आपला एके काळचा सिंध प्रांत पाकिस्तानात गेला, ही गोष्ट पूर्ण विचारांती प्रांत आहे.
अशा वेळी भारताच्या राष्ट्रगीतात म्हणजे ‘जन गण मन’मध्ये पंजाबनंतर सिंध जरी येत असले, तरी जो प्रांत आपला नाही, तो आपला म्हणून उच्चार कसा करता येईल? म्हणून रवींद्रनाथांच्या गीतात ते जेव्हा राष्ट्रगीत म्हणून ठरवले गेले, तेव्हा सिंधच्या जागी सिंधू हा बदल करण्यात आला. बहुमताने तो मान्य करण्यात आला, पण अजूनही पाहा सिंधूच्या ऐवजी सिंधच ऐकू येते! हे मान्य आहे की, अजूनही सिंधमध्ये आमचा जीव अडकलेला असू शकतो. त्या मनाचा आदरदेखील करावा, पण लोकशाही पद्धतीने सिंधऐवजी सिंधू हे स्वीकारले गेले आहे, ते तसेच म्हणायला हवे की नाही? तरच राष्ट्रगीताचा मान सांभाळला जाईल ना?
म्हणून शाळा-कॉलेजमधल्या म्हटले जाणाऱ्या आपल्या राष्ट्रगीतासंबंधात पुन्हा एकदा आवर्जून सांगावसे वाटते की, सिंधऐवजी सिंधू म्हणा! तसेच ठसवले गेले, तर ही पुढच्या पिढीला हा वारसा हस्तांतरित करतील. सिंधची आठवण काढून आता काय साधणार आहोत? दुसरी गोष्ट, राष्ट्रगीत म्हणताना आम्ही सगळे एकाच पद्धतीने ध्वज वंदनासाठी उभे राहायला हवे की नाही? कुणी हात पुढे बांधून उभे, कुणी हात पुढे ठेवून, कुणी छातीच्या पुढे आडवा हात ठेवून... हे असे असता, ‘आम्ही सारे एक’ कसे काय होऊ शकते? म्हणून म्हणतो, राष्ट्रगीताच्या वेळी कसे उभे राहायचे हे एकदा निश्चित करू या, त्यात एकवाक्यता यायला हवी. एवढेच काय, ही गोष्ट फक्त १५ आॅगस्टपुरतीच नाही, कायमची आहे. म्हणून त्याची पुन्हा एकदा जाहीर वाच्यता.
अनाम लेखक सापडला
स्वातंत्र्य युद्धातल्या अनेक वीरांची नावे इतिहासाला माहीतच नाहीत. मग त्यांच्या कर्तृत्वाच्या गाथा कळणे दूरच राहिले. या वेळच्या स्वातंत्र्य दिनाला एक नवीनच ग्रंथ हातात आला. तो आहे साहेबराव ठाणगे संपादित ‘स्वातंत्र्य योद्धा हिंदुराव आप्पा-गाथा आणि गीते’ आता हिंदुराव आप्पा म्हणजे बेचाळीसच्या चळवळीत ज्यांनी वसंतदादा पाटील यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढाईत साथ दिली. एवढेच नव्हे, तर सांगळेच्या तुरुंगातून सफाईने पलायन करून क्रांतीची ज्योत तेवती ठेवली, असे आप्पा पाटील येडेनिपाणीचे पाटील!
खरे तर येडेनिपाणीचे पाटील म्हटले की, पी. सावळारामच आठवतात, त्यांची ‘जेथे सागरा धरणी मिळते, तेथे तुझी मी वाट पहाते’, ‘गंगा यमुना डोक्यात उभ्या का’ अशी एकापेक्षा एक गीते आठवतात, पण सावळारामाचे धाकटे भाऊ म्हणजे हिंदुराव आप्पा हे ठाऊक होते. आप्पांना तसे दीर्घायुष्य लाभले. (जन्म १३ नोव्हे. १९१७, मृत्यू ३ सप्टेंबर १९९३) स्वातंत्र्याचे गोड फळ चाखले, तो सगळा इतिहास सगळ्यांनाच ठाऊक आहे, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आप्पाराव तुरुंगात असताना, त्याच्या प्रतिमेला काव्यझरा फुटला आणि त्यांनी विविध विषयांवर लिहिलेले लेखन ते बाड अंधारातच राहिले.
पण आता इतक्या वर्षांनंतर त्यांच्या मुलाने अशोक पाटील यांनी हे सगळे बाड साहेबराव ठाणगेंकडे सुपुर्द केले. त्यांनी कवी हृदयानेच त्याचे संपादन केले आणि हा ठेवा आता रसिकजनांसाठी उपलब्ध झाला आहे.
क्रांतीचा घेऊन झेंडा। फिरवूया नवखंडा
घेऊनिया हाती दंडा ।
मारू आपण शत्रूणी खरोखर रे ।।
असे लिहिणारे हिंदुराव आप्पा.
हलके हलके हलके बोला ।
पाळण्यात हा बाळ झोपला
परसामधल्या केळफुलावर ।
चिवचिव करती चिऊ पाखरे
उढूनी जावा या उठल्यावर । बाळसंगे खेळायाला ।।
असे जेव्हा नाजूकपणे लिहितात, तेव्हा स्तिमित व्हायला होते .....
प्रस्तुत संग्रहाला प्रा.अशोक बागवे यांची प्रस्तावना आहे. त्या प्रस्तावनेत त्यांनी हिंदुरावांच्या कवितांचा समग्र आढावा घेऊन, त्यांचे कवी म्हणून स्थान अधोरेखित केल आहे. हा सगळा ऐवज पाहताना वाटते, त्याचा कवित्वाचा झरा पुढे कसा बहरला असेल?
कुणी सांगावे अशोक पाटील यांना, अजून पडताळाची पडताळणी केली, तर आणखीही काही सापडेल!